प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या धास्तीने तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला येणाऱया रुग्णांचा ओघ सुरूच आहे. शनिवारी 24 तासात 110 हून अधिक जणांनी आपली आरोग्य तपासणी केली होती. रविवारीही या विभागात 100 हून अधिक जणांनी आरोग्य तपासणी करून घेतली आहे.
आयएमए हॉलमध्ये फ्लू कॉर्नर विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी सकाळपासून रात्री 7.15 पर्यंत 95 हून अधिक जणांनी या विभागात आरोग्य तपासणी करून घेतली. ताप, खोकला, घसा खवखवणे आदी लक्षणे दिसून आली तरी कोरोनाच्या भीतीने लोक याच विभागात तपासणीसाठी दाखल होत आहेत.
आयएमए हॉलच्या पहिल्या मजल्यावर संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. या विभागाबरोबरच परिसरात वारंवार फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे कामही सातत्याने हाती घेण्यात येत आहे. ताप किंवा इतर लक्षणे दिसून आल्यास लोक स्वतःहून वैद्यकीय तपासणीसाठी या विभागाकडे येत आहेत. याबरोबरच जिल्हय़ातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतून तपासणीसाठी संशयितांना या विभागात पाठविण्यात येत आहे.
बेळगाव जिल्हय़ात आजपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
संशयितांची तपासणी व त्यांच्यावर उपचार करताना पुरेपूर खबरदारी घेण्यात येत आहे. बेळगाव जिल्हय़ात आजपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसला तरी सिव्हिल हॉस्पिटलमधील क्वारंटाईन व आयसोलेशन विभागात दाखल होणाऱया संशयितांचा ओघही सुरूच आहे.
आयसोलेशन व क्वारंटाईन विभागाबरोबरच आयएमए हॉलमध्ये सुरू करण्यात आलेल्या फ्लू कॉर्नर विभागाबाहेर सिव्हिल हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीला प्रत्येक विभागाबाहेर दोन पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या विभागात उपचार घेणारे संशयित रुग्ण पळून जाऊ नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे









