ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्या रब्बी हंगाम महत्वाच्या टप्प्यात असून येत्या तीन महिन्यांत सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण विविध उपाययोजना करून रोखण्यात यावे तसेच रोहित्र, ऑईल आणि इतर साहित्य पुरेशा प्रमाणात अतिरिक्त स्वरुपात ठेवण्यात यावे व त्याचा आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात यावा असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
फोर्ट येथील महावितरणच्या कार्यालयात ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने रब्बी हंगामातील वीजपुरवठ्याबाबत आढावा घेत महावितरणच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता उपस्थित होते.
डॉ. राऊत यांनी सांगितले की, रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते किती दिवसांत बदलणार किंवा दुरुस्त करणार, शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी, त्यासंदर्भातील मोबाईल क्रमांक आदींची माहिती स्थानिक पातळीवर देण्यात यावी. नादुरुस्त झालेले कृषिपंपांचे रोहित्र युद्धपातळीवर बदलण्याचे किंवा दुरुस्त करण्यात यावे. आवश्यक त्या ठिकाणी रोहित्रांची क्षमता वाढविण्यात यावी. अतिरिक्त स्वरुपात रोहित्र तसेच ऑईल व इतर साहित्याची कोणतीही कमतरता नाही. मात्र तरीही वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्यास निष्काळजीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद् कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
मागील सरकारच्या कालावधीत कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देणे बंद करण्यात आल्याने कृषिपंपांसाठी अनधिकृत वीजवापर वाढला आहे. त्यामुळे रोहित्र अतिभारित होऊन नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. महाविकास आघाडी शासनाने नुकतेच नवीन कृषिपंप धोरण जाहीर केले असून त्याप्रमाणे लघुदाब, उच्चदाब वाहिन्यांसह सौरद्वारे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्यात देण्यात येणार आहे. या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.








