भर दुपारी मारला पाडा, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
शहर वार्ताहर/राजापूर
राजापूर तालुक्यातील देवाचेगोठणे बुरंबेवाडी येथील नारायण बाणे यांचा पाडा बुधवारी भर दुपारी बिबटयाने मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या परीसारत बिबट्याची दहशत वाढली आहे.
देवाचेगोठणे परीसरात दाने महिने बिबट्याचा मुक्त संचार चालू आहे. दिवसा रानात तर रात्री वस्तीमध्ये बिबट्याचे दर्शन घडत आहे. तसेच रस्त्यावरही दिवसा व रात्रीही वाहन चालकांना बिबट्या दिसत आहे. महिन्याभरापुर्वी राऊतवाडी येथील विजय राऊत यांची गाय बिबटयाने फस्त केली होती. त्यामुळे या परीसरात भीतीचे वातारवण आहे. वाहन चालकही रात्रीच्या वेळी या परीसरात फिरण्यास धजावत नाहीत. सद्या जनावरांना वैरणसाठी गवत काढणे, लागडे गोळा यासाठी ग्रामस्थांचा नेहमीच जंगल परीसरात संपर्प येत आहे. मात्र बिबटयाची दहशत असल्याने ग्रामस्थ जंगलामध्ये जाण्यास तयार नाहीत.
दरम्यान बुधवारी भर दुपारी नारायण बाणे यांचा पाडा बिबट्याने मारल्याने भिती अधिकच वाढली आहे. या संदर्भात सरपंच कमलाकर कदम यांनी वनविभागाला कळविले असून संबधित शेतकऱयाला नुकसान भरपाई मिळावी व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.









