प्रतिनिधी / खेड
खेड शिवसेनेचे पहिलेवहिले शहरप्रमुख व माजी उपनगराध्यक्ष सुधाकर मथूर बुटाला (८२) यांचे गुरुवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. माजी नगरसेवक व मुरली मनोहर पतसंस्थेचे संचालक राजेश बुटाला यांचे ते वडील होत.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते. १९६८ मध्ये शिवसेनेची येथे शाखा स्थापन झाल्यानंतर शहरप्रमुख पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. अत्यंत खडतर परिस्थितीत शिवसेनेची संघटनात्मक बंधणी करून तरूणांना एकसंघ केले. मुंबई, ठाणे पाठोपाठ खेड नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची किमया सुधाकर बुटाला यांनी केली होती. ते येथील नगरपरिषदेचे सलग ५ वर्षे उपनगराध्यक्षही होते. शहरप्रमुख पदाच्या माध्यमातून विविधांगी सामाजिकउपक्रम राबवून शिवसेना तळागाळात पोहचवण्याचे काम केले.
सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव साजरा करण्याची प्रथा निर्माण करत कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्यात त्यांचे विशेष योगदान होते. एस. टी. आगाराची येथे उभारणी व्हावी, याकरिता त्यांनी अनेकदा आंदोलनाचा मार्ग पत्करला. त्यांच्या सततच्या रेट्यामुळेच येथे एस.टी.आगाराची निर्मिती झाली होती. सहजीवन शिक्षण संस्था व मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेत महत्त्वाच्या पदांवरही काम केले आहे. १९८० मध्ये शिवसेनेने दिलेली विधानसभेची उमेदवारीही त्यांनी नाकारली होती.