उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनमोल सहाकार्य
खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते शुभारंभ
जनतेने मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार
प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आरोग्यविषयक पायाभूत सोयीसुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी व ऑक्सिजन क्षमता वाढवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनमोल सहकार्यातून सी. एस. आर. फंडातून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ज्युरा ऑक्सिजन सिलेंडर प्रणाली कार्यान्वित झाली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. या प्रणालीमुळे रुग्णांना ऑक्सिजन बेडच्या सुविधांअभावी मुंबई, पुणेसारख्या ठिकाणी धाव घ्यावी लागणार नाही.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखून रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, याकरिता उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ बुटाला यांच्या पुढाकारातून कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात ४ ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाले आहेत. यासाठी एच.डी.एफ.सी. बँक व बंधन बँकेचे सहकार्य लाभले आहे. एका सिलिंडरमध्ये २५० हून अधिक लिक्विडची क्षमता आहे. एका ड्युरा सिलिंडरमध्ये २१ जम्बो सिलिंडरची क्षमता असून ८८० लिटर असे प्रमाण राहणार आहे.
या रूग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर प्रणाली कार्यान्वित झाल्याने रूग्णांना आता मुंबई, पुणेसारख्या ठिकाणी जावे लागणार नाही. यामुळे रूग्णांच्या वेळेची अन् खर्चाचीही बचत होणार आहे. या रूग्णालयात अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कोस्तुभ बुटाला यांनी दिली. याप्रसंगी माजी आमदार संजय कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, एच डी.एफ.सी. बँकेचे आदित्य मराठे, बंधन बँकेच्या स्वाती शालीग्राम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतिश चिकणे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.









