सतर्क रहाण्याचे आवाहन, तीन घरांना धोका कायम
दापोली / प्रतिनिधी
दापोलीतील आसूद येथील डोंगराला गेलेली उभी भेग ही दापोली तालुक्यात झालेल्या अति पावसाने गेली असल्याचा प्राथमिक अंदाज भूगर्भ शास्त्रज्ञांनी दापोली येथे घटनास्थळाची पाहणी केल्यावर व्यक्त केला.
दापोली तालुक्यातील आसुद येथे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या धुवांधार पावसाने येथील सातारकरवाडी या वाडीतील डोंगराला उभी भेग गेली होती. शिवाय यामुळे वाडीतील घरांचे जोते देखील फुटले होते. शिवाय घरांच्या भिंतींना देखील भेगा गेल्या होत्या. यामुळे येथील ग्रामस्थांनी या डोंगराची पहाणी भूगर्भ शास्त्रज्ञांनी करावी अशी मागणी महसूल विभागाकडे केली होती यानुसार गुरुवारी प्रभारी वरिष्ठ भूवैज्ञानिक संदीप माने व त्यांचे सहाय्यक सुयोग पडवळ अजय सावंत यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यांच्यासोबत मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर, तलाठी अमित शिगवण, संतोष माने, कल्पेश माने, हरिश्चन्द्र माने, दिलीप बांद्रे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.