प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील जनता अनेक कारणांनी त्रस्त आहे. रस्ते प्रचंड खड्डेमय झाले आहेत. पाण्याच्या नावावर राजकारण करून जनतेचे कंबरडे मोडायचे काम सत्ताधाऱयांनी केले आहे. या साऱया समस्यांना कंटाळून नगर परिषदेत चक्क उनाड गाढवाला बांधून नेत शहर भाजपाच्यावतीने नगर परिषदेच्या कारभाराचा पाढा वाचला.
रत्नागिरी नगर परिषदेच्या शहरामध्ये प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी मंत्री महोदयांच्या उपस्थितीत पार पडला. पण शहरातील समस्यां आजही ‘जैसे थे’ अशाच आहेत. शहर भाजपाच्यावतीने येथील नागरिकांना समोर जावे लागत असलेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी यादिवशी अनोखे गाढव आंदोलन केले. पाणी योजना गेल्या 2 वर्षात सुरू झाली. परंतु गेले 10-12 वर्षे शहरवासियांना रस्त्यांच्या खड्डय़ांचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळय़ाच्या तोंडावर थातूरमातूर पॅचिंग करून पावसाळा संपायच्या आत रस्ता गायब होत आहे. याचा फटका नागरिकांसह शहरात मोकाट फिरणाऱया प्राणीमित्रांना बसत आहे. त्यांनाही दुखापतींचा सामना करावा लागत असल्याचे शहर भाजपाचे राजू कीर यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी नगर परिषद वर्षाला लाखो करोडो रुपये भटक्या प्राण्यांवर करत आली आहे. परंतु आज नगर परिषदेकडे प्राण्यांसाठी डॉक्टर नाही, दवाखाना नाही, केंडवाडा नाही, आजारी दुखापतग्रस्त गुरे शहरात फिरताना दिसत आहेत. जनतेचा कररुपी पैसा या प्राण्यांवर कसा खर्च केला जात आहे, याचा प्रश्न जनतेला आहे. उनाड मोकाट कुत्रे, गुरे, गाढवे, खेचरांचा त्रास जनतेला होत आहे. या सर्व जनतेच्या त्रासाचा पाढा वाचून दाखवण्यासाठी भाजपा शहर कार्यकर्ते शहरात फिरणाऱया उनाड गाढवालाच नगर परिषदेत दुपारी घेऊन गेले. यावेळी राजन फाळके, राजीव कीर, अशोक वाडेकर, योगेश हळदवणेकर, नीलेश आखाडे, दिनदयाळ सुखटणकर, उपस्थित होते.









