अध्याय तेरावा
प्रकृती म्हणजे माया, ही त्रिगुणात्मक असून या गुणांपासून देह उत्पन्न होतो. देहापासून आत्मज्ञान होते आणि त्या आत्मज्ञानाने मनुष्य गुणांच्या वेढय़ातून बाहेर पडतो. भगवंतांचे बोल उद्धवाला मनोमन पटले. तरीही त्याच्या मनात विचार आला की, नश्वर देहापासून परब्रह्माचा सर्वोच्च आनंद मिळण्याची शक्मयता असताना तो सोडून देऊन मनुष्य विषयांवरच लुब्ध होतो. असे का घडते? उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देत आहेत. ते म्हणाले, अज्ञानी माणसाच्या मनामध्ये देह म्हणजे ‘मी’ अशी खोटी कल्पना उत्पन्न होते. आपण शुद्ध, बुद्ध व नित्यमुक्त होणे यातच आपले खरे कल्याण आहे ही गोष्ट विसरून रजोगुणाशी लंपट झाल्यामुळे, रजोगुण त्या पुरुषाला कामासक्त बनवतो. अभिमान हा रजोगुणात रंगून गेला की, रजोगुण अनावर वाढतो आणि त्यामुळे मन विकाराला वश होते. सुखदुःख, काम, क्रोध इत्यादि विकारांनी घेरलेले मन अनेक प्रकारचे संकल्पविकल्प करू लागते. एकांतात असतानाही ध्यानामध्ये विलासाचेच विचार येत असतात. रजोगुणाने दुष्ट वासना उत्पन्न होऊन बुद्धीही दुष्टच होते. तसेच धन, धान्य, पुत्र, यांचे सुख असावे, इहलोकचे व परलोकचे सुख असावे, अशी रजोगुणाची अतिशय उत्कट इच्छा असते. त्या कामनांच्या अधीन झालेला व मन ताब्यात नसलेला मनुष्य कळून सवरून, दुःखदायक अशी कामे करतो. तो कामाची बटिक होऊन राहतो. त्याला काम जसे जसे नाचवीत असतो, त्या त्या विकारांनी युक्त होऊन तो नाचतो. कामाचा अंकित झाला की, पुढे ज्यामुळे दुःख उत्तरोत्तर वाढतच जाईल, असे सकाम कर्म करणे भाग पडते आणि तो अतिशय गर्वि÷ होतो. तो रजोगुणाच्या मोहात पडलेला असतो, म्हणून त्याला इंद्रियजय साधत नाही. तो जन्ममरणांचा अंकित होऊन तदनुसारच सर्व कर्मे करतो. रजावर लोलुप होणारे लोक अत्यंत निर्बुद्ध असल्याचे प्रसिद्धच आहे. रजोगुणाने बद्ध केल्यानंतर महामोहाचा प्रवेश होतो, तेव्हा भ्रमाची वावटळ सुटून तमोगुणही सैरावैरा फैलावतो. म्हणून तो कामाचे सेवन करतो. विषयांची विरक्ति त्याला होत नाही. सुखोपभोगाच्या सवयीने रजोगुण खवळला की, त्याला आवरणार कोण ? विचारी असतात तेही विषयाने बद्ध झालेले असतात. म्हणून विषयाचा त्याग या लोकात होत नाही. आता तुझ्या मनात कदाचित असे येईल की, मीच असं सांगतोय म्हंटल्यावर तर मग ऊपायच खुंटला आणि प्राण्यांची सद्गती देखील खुंटली. पण त्यावरही उपाय आहे तो ऐक. विचारी लोकांच्या ठिकाणी विषयवासना उत्पन्नच होत नाही. इतकेही करून कधी काळी त्यात विक्षेप आलाच, तर त्यांनी अभ्यास करावा. असा अभ्यास सतत चालू ठेवायला हवा. जेव्हा मूळ रस्ता चुकून मनुष्य दुसऱयाच मार्गाला लागतो आणि जेव्हा लक्षात येतं की, रस्ता चुकलाय तेव्हा परत फिरून जिथं रस्ता चुकला होता त्या ठिकाणी परततो आणि योग्य मार्गाने पुढं जातो. ही गोष्ट परमार्थात वारंवार करावी लागते. या गोष्टीला अभ्यास असं म्हणतात आणि मुक्कामी पोहोचेस्तोवर असं करत राहणं ही तपश्चर्या होय. अशी तपश्चर्या करत राहिलं की, त्याची सवय आपोआपच साधकाला होते. असा अभ्यास अंगवळणी पडला की, भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशानुसार वागायचंय हे मुद्दामहून लक्षात ठेवायची गरज पडत नाही. तो सहजस्वभाव होतो. अशा वर्तनाने तो सर्व लोकात वंदनीय होतो.
रज, तमोगुणांनी ज्ञानी माणसाचीसुद्धा बुद्धी विषयांकडे धाव घेते परंतु तो सावधगिरी बाळगून मन एकाग्र करून विषय दोषयुक्त आहेत, हे जाणून त्यामध्ये आसक्त होत नाही. रज आणि तम या गुणांनी बुद्धीला भरीला घातलंच, तर ज्ञात्याने आळस सोडून मनाला आवरून धरावे. स्त्रीचा देह हाडांचा आणि मांसाचा बनविलेला असून, वि÷ामूत्रांचा कोथळा आहे हे लक्षात घेऊन तिच्याविषयी विचार केला तर कंटाळा येतो. तिचा भोग हे केवळ नरकाचे साधन होय. याप्रमाणे स्त्रीच्या भोगामध्ये असलेले दोष लक्षात घेऊन मन विषयांपासून तत्काळ दूर करून ते नियमांनी आवरून धरावे.
क्रमशः







