गावातील बहुसंख्य गल्ल्यांमध्ये डॉल्बीच्या तालावर रंगोत्सव
प्रतिनिधी /येळ्ळूर
कोरोनामुळे दोन वर्षांपासून रंगपंचमीवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे हा सण साजरा करणे कठीण झाले होते. मात्र, यावषी कोरोना ओसरल्यानंतर रंगपंचमी साजरी करण्यासाठी तरुणाईने जोरदार तयारी केली. गावातील अनेक गल्ल्यांमध्ये डॉल्बीचे आयोजन केले होते. डॉल्बीच्या तालावर तरुणाईने ठेका धरत रंगोत्सव साजरा केला.
येळ्ळूरसह परिसरात होळी सणानंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासूनच तरुणांनी याची तयारी सुरू केली होती.
तरुणांबरोबरच तरुणी आणि महिलांनीही आपला सहभाग दर्शविला. पाण्याच्या फवाऱयांसह डॉल्बीच्या तालावर ठेका धरत आपली हौस पुरी केली. रंगांची उधळण करत, एकमेकांना रंग लावत आनंदोत्सव द्विगुणीत करण्यात आला.
सध्या पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. दुपारी पेपर असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनीही रंगोत्सवाचा आनंद घेतला. त्यानंतर अंघोळ करून हे विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज झाले होते. सकाळपासूनच बालचमूंनी रंगांचा आनंद घेण्यास सुरुवात केली होती. सकाळी 8 नंतर तरुणाई रंगोत्सवासाठी बाहेर पडू लागली. तरुणींनीही यावेळी डॉल्बीवर नाचत रंगोत्सव साजरा केला. एकूणच येळ्ळूर परिसरात रंगोत्सवामुळे एक नवीन वातावरण निर्माण झाले होते. पाण्याचा फवारा मारत तरुण बेधुंद झाले होते.
सुळगे-येळ्ळूर येथेही रंगपंचमी पारंपरिक पद्धतीने
सुळगे : येथे पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली. चौकाचौकात पाण्याचे टँकर उभे करून पाण्याची फवारणी करण्यात आली. तरुणांनी बेभान होऊन आनंदोत्सव साजरा केला. डॉल्बी तसेच इतर वाद्यांच्या तालांवर तरुणांनी जल्लोष केला. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत रंगपंचमी साजरी करण्यात आली. गावातील मंदिरांमध्ये हक्कदार राहुल पाटील व विष्णू भंगेण्णावर यांनी विधिवत पूजा करून देवांना रंग लावला. त्यानंतर रंगपंचमीचा समारोप करण्यात आला.









