वृत्तसंस्था / नवी दिल्ली
यू-17 महिला विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाचे शिबिर 15 ऑक्टोबरपासून झारखंडमध्ये सुरू होणार असल्याचे अ.भा.फुटबॉल फेडरेशनचे (एआयएफएफ) सरचिटणीस कुशल दास यांनी बुधवारी सांगितले.
यू-17 महिला विश्वचषक स्पर्धा आधीच्या नियोजनाप्रमाणे येत्या नोव्हेंबरमध्ये होणार होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढील वर्षीच्या फेब्रुवारी-मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे खेळाडूंचे शिबिर घेण्यासही विलंब झाला आहे. ‘ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात शिबिर आयोजित करण्याची आमची योजना होती. पण आता ते 15 ऑक्टोबरपासून घेण्याचे ठरविण्यात आले आहे,’ असे दास यांनी सांगितले. एआयएफएफ सदर शिबिर ऑगस्टमध्येच सुरू करण्याच्या विचारात होते. पण देशभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांनी तो विचार सोडून दिला होता. शिबिर आयोजनाची संधी झारखंडला देण्यात आली आहे. कारण त्या राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यासाठी खुपच उत्सुकता दाखविली होती. विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संभाव्य खेळाडूंत झारखंडच्या 8 मुलींचा समावेश असून अंतिम संघात आपली निवड व्हावी यासाठी त्या जोरात तयारी करीत आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या संघाचा अनुभव दौरा आयोजित करण्याचा फेडरेशनचा विचार असल्याचेही सांगण्यात आले.









