ऑनलाईन टीम / लखनऊ :
लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेल्या उत्तर प्रदेशात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. कोरोना व्हायरसने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मागे टाकत एक नवा उच्चांक गाठला आहे. मागील 24 तासात प्रदेशात तब्बल 20,510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी मंगळवारी 18,021 नवे रुग्ण आढळून आले होते.
आरोग्य विभागाचे एसीएस अमित मोहन प्रसाद यांनी बुधवारी सांगितले की, राज्यात 20,510 नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार 835 इतकी झाली आहे. तर मागील 24 तासात 4,517 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर राज्यातील एकूण रुग्ण संख्येने 7 लाखांची संख्या पार केली आहे.
- गुजरातमधून मागविणार 25 हजार रेमडेसिविर
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्टनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठे अंतर वाढत चालले आहे. बाजारात इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी मोठा निर्णय घेत, गुजरातमधील अहमदाबादमधून 25 हजार इंजेक्शनचे डोस तात्काळ मागविण्याचे आदेश दिले आहेत.