ऑनलाईन टीम/तरुण भारत
युक्रेनची राजधानी कीव येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असून तेथील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची अॅडवायझरी भारतीय दूतावासाकडून जारी करण्यात आली असताना आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. खारकीव्हमध्ये स्फोटात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून याविषयी माहिती देण्यात आली आहे.
रशिया-युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरु असून रशियाकडून युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले होत आहेत. युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकून पडले आहेत. काहींना ऑपरेशन गंगा अंतर्गत भारत आणण्यात आलं आहे. अजून हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकलेले असताना खारकीव्हमध्ये सुरू असलेल्या स्फोटात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
सांगायला अत्यंत दु:ख होतं आहे की, आज सकाळी खारकीव येथील गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालय त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. आम्ही त्याच्या कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो, असं ट्विट परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केलं आहे.
मृत्यू झालेला विद्यार्थी कर्नाटकचा
खारकीव्ह मध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. रशियन सैनिकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेला शेखरप्पा ग्यानगौडा नवीन हा एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे. त्याच्या मृत्युने भारताला मोठा धक्का बसला आहे. रशिया युक्रेनच्या युद्धाची झळ साऱ्या जगाला बसत आहे. यात अनेक देशातील लोक अडकले आहेत. अमेरिकेने ठणकावूणही रशिया सर्व विरोध झुगारून युक्रेनवर रोज जोरदार हल्ले चढवत आहे.