प्रतिनिधी / पणजी
आज मंगळवार 1 जूनपासून राज्यात मान्सूनला प्रारंभ होत आहे. पुढील 4 महिने हे पावसाचे आहेत. दरम्यान, यंदा पडलेल्या मान्सूनपूर्व पावासाचे प्रमाण त्या तुलनेत जास्तच होते. गेल्या 70 वर्षातील हा तिसऱयांदा सर्वाधिक पडलेला मान्सूनपूर्व पाऊस होता.
पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनपूर्व पाऊस बऱयाच प्रमाणात कोसळला. तौक्ते चक्रीवादळामुळे गोव्याला पावसाने झोडपून काढले. साधारण दि. 15 मेपासून सुरू झालेला पाऊस हा यंदा 31 मे पर्यंत सतात्याने पडत राहिला. मान्सूनपूर्व पाऊस अनेकवेळा जोर धरतो. 1 जूनपासून पडणारा पाऊस हा मान्सूनचा पाऊस आहे, असे गृहित धरले जाते. 30 सप्टेंबरपर्यंत पडणारा पाऊस हा मान्सूनचा व त्यानंतर पडणारा पाऊस हा मान्सूनोत्तर पाऊस गृहित धरला जातो. मार्चपासून पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस म्हणून त्यांची नोंदणी होती.
1961 मध्ये सुमारे 26 इंच विक्रमी पाऊस
यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार पडला. यापूर्वी 2006 मध्ये सर्वांधिक 591.9 मीमी म्हणजेच जवळपास 23 इंच एवढा पाऊस नोंदविला गेला होता. 2007 मध्ये 3 इंच, 2015 सुमारे 4 इंच, 2012 मध्ये 5 इंच व 2021 मध्ये सुमारे 16 इंच एवढा पाऊस झालेला होता. यापूर्वी 1990 मध्ये 14 इंच पाऊस पडला होता. 1962 मध्ये 15 इंच, 1961 मध्ये सुमारे 26 इंच एवढा विक्रमी पाऊस पडला होता, तो विक्रम अद्याप मोडला गेलेला नाही.
दरम्यान, काल सोमवारी राज्यातील काही भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी जुने गोवे येथे मुसळधार पाऊस पडला. रात्री पणजी येथेही पावसाने हजेरी लावली. राज्यात आज काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मान्सूनचे आगमन येत्या दि. 7 जून रोजी होईल, असा अंदाज वर्तविला आहे.









