नगराध्यक्षांची माहिती, गणेश विसर्जनाचेही नियोजन
वार्ताहर / सावंतवाडी:
22 ऑगस्टपासून गणेश चतुर्थी आहे. यंदा ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात बाजारपेठेचे नियोजन हाती घेण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या आधी आठ दिवस बाजार आरपीडी ते रामेश्वर प्लाझा बिल्डींग या मार्गावर तलावाकाठी दोन्ही बाजूने भरविला जाणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न आहे, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, नासीर शेख, आसावरी शिरोडकर उपस्थित होते.
परब म्हणाले, गणेश चतुर्थी सणात शहराकडे ग्रामीण भागातील लोक खरेदीसाठी येतात. मात्र, यंदा ‘कोरोना’चे सावट आहे. याचा विचार करून बाजारपेठेचे नियोजन आतापासून करण्याचे ठरले आहे. यावर्षी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. तसेच पार्किंगची जागाही निश्चित केली जाणार आहे.
रामेश्वर प्लाझा मार्गावर चतुर्थीची बाजारपेठ
परब म्हणाले, गणेश चतुर्थीच्या आधी चार दिवसांपासून चतुर्थीच्या सामानाची बाजारपेठ आरपीडी, पालिका मार्ग ते रामेश्वर प्लाझा या दरम्यान भरविण्यात येणार आहे. मोकळय़ा जागेत बाजार भरल्यामुळे गर्दी टळेल. ग्राहकांचे वाहन पार्किंग गार्डन, तीन मुशी ते राजवाडा परिसर तर टेम्पो वाहन पार्किंग पालिका ते श्रीराम वाचन मंदिर मार्गावर केल्यामुळे नागरिकांना खरेदीला येणे-जाणे सुलभ होईल.
गणेश विसर्जनाचे खास नियोजन
मोती तलावात गणेशमूर्ती विसर्जनासाठी खास नियोजन पालिका करणार आहे. सर्वांना गणेशमूर्ती सुरळीतपणे विसर्जन करता येईल, अशी जागा ठरविण्यात येणार आहे. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक गणेश मंडळांनी आपापले नियोजन करावे, असे आवाहन परब यांनी केले.









