वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
आयसीसी टी-20 वेश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकली गेल्यानंतर आयपीएल स्पर्धेचा मार्ग खुला झाला असून आयपीएल कार्यकारिणी येत्या आठवडय़ाभरात किंवा जास्तीत जास्त 10 दिवसाच्या आत नव्याने बैठक घेईल आणि त्यात पुढील कृती आराखडय़ाची चर्चा होणार आहे. यंदाची स्पर्धा पूर्ण स्वरुपात होईल आणि यासाठी आमचे संयुक्त अरब अमिरातीला सर्वोच्च प्राधान्य असेल, असे आयपीएल कार्यकारिणी अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले.
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धा कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे लांबणीवर टाकली जात असल्याची घोषणा आयसीसीने सोमवारी केली. त्या पार्श्वभूमीवर आयपीएल कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या काही दिवसात होत आहे. या बैठकीत स्पर्धेची अंतिम रुपरेषा निश्चित होणे अपेक्षित आहे.
‘यंदाची आयपीएल स्पर्धाही नेहमीप्रमाणे पूर्ण स्वरुपाची असेल. 60 सामने खेळवण्यावर आमचा भर असेल’, असे ब्रिजेश पटेल वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत ही स्पर्धा भरवण्यात कोणती मुख्य आव्हाने आहेत, या प्रश्नावर, प्रेक्षकांना परवानगी दिली जात नसेल तर ती कुठेही घेतली तरी त्यात काहीही फरक पडत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयसीसीने सोमवारी अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच विविध प्रँचायझींनी आपल्या रणनीतीवर मेहनत घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, कोव्हिड-19 मुळे जवळपास सर्व भारतीय खेळाडूंना मैदानावरही जाता आले नाही, त्यांना प्रत्यक्ष सामन्याच्या पूर्वतयारीसाठी किमान 3 ते 4 आठवडय़ांचा कालावधी लागेल, असे संकेत आहेत. विविध प्रँचायझींशी करारबद्ध विदेशी खेळाडू आपापल्या देशांमधून थेट युएईमध्ये येतील.
‘आमच्या खेळाडूंना किमान 3 ते 4 आठवडय़ांचा सराव आवश्यक असेल. बीसीसीआयने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आम्ही त्यानुसार रणनीती निश्चित करु. सध्याच्या घडीला यंदाची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये होईल, असे दिसते आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत’, असे एका प्रँचायझीने यावेळी स्पष्ट केले.
आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर काहीच कालावधीत भारताचा संघ 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार आहे. त्यामुळे, भारतीय कसोटीपटूंचा सराव हा देखील मुद्दा असेल. चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी यांच्यासारखे कसोटी स्पेशालिस्ट, जे आयपीएलचा भाग नाहीत, ते आयपीएलच्या कालावधीत अहमदाबाच्या मोटेरा स्टेडियमवर साहायक पथकातील सदस्य सराव करतील, असे संकेत आहेत.
भारतीय संघाच्या साहायक पथकातील सदस्य देखील यावेळी मोटेरावर असणार आहेत









