भारतात शक्य नसल्यास युएई, दक्षिण आफ्रिकेचे पर्याय राखीव
मुंबई / वृत्तसंस्था
लखनौ व अहमदाबाद या नव्या संघांसह आयपीएल स्पर्धेतील विविध प्रँचायझींनी यंदाची आयपीएल आवृत्ती मुंबई-पुण्यात घ्यावी, असा आग्रह धरला असून ते शक्य नसल्यास बीसीसीआयसमोर युएई व दक्षिण आफ्रिकेचे पर्याय राखीव असतील. यंदाची आयपीएल दि. 27 मार्च किंवा 2 एप्रिल रोजी सुरु होऊ शकते. मात्र, तूर्तास नियामक मंडळाने याबाबत काहीही चित्र स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, अहमदाबादने हार्दिक, रशीद, गिल तर लखनौने बिश्नोई, केएल राहुल व स्टोईनिस यांना करारबद्ध केले आहे.
‘यंदाची आयपीएल दि. 27 मार्चपासून खेळवावी, असा काही प्रँचायझींचा आग्रह आहे. मात्र, भारताचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना लंकेविरुद्ध दि. 18 मार्च रोजी होत आहे आणि लोढा कमिटीच्या शिफारशीनुसार, शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना व आयपीएलमध्ये किमान 14 दिवसांचे अंतर असावे, अशी तरतूद असल्याने दि. 2 एप्रिल रोजीच स्पर्धेची सुरुवात होऊ शकते’, असे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या भूमीत आणि विंडीज व लंकेविरुद्ध मायभूमीत होणाऱया मालिकांसाठी भारतीय खेळाडू सातत्याने बायो-बबलमध्ये असतील. यामुळे ते थकलेले असतील, याचाही विचार केला जाणे आवश्यक आहे, असे या सूत्राने नमूद केले.
‘यंदा आयपीएलमधील सामने मुंबई व पुण्यात व्हावेत. पण, दुर्दैवाने भारतातील कोरोना स्थिती बिघडली तर अशा परिस्थितीत संयुक्त अरब अमिरातचा पर्याय दुसरा व दक्षिण आफ्रिकेचा पर्याय शेवटचा ठेवावा’, असा प्रँचायझींचा आग्रह आहे. यापैकी, युएईमध्ये आयपीएल स्पर्धा तीनवेळा आयोजित केली गेली तर 2009 आयपीएलचे दक्षिण आफ्रिकेत आयोजन केले गेले होते. श्रीलंकेत स्पर्धा भरवली जाण्याची चर्चा होती. पण, याबाबत बैठकीत चर्चा झाली नाही, असे संकेत आहेत.
मुंबईमध्ये 3 मैदाने आहेत आणि पुण्यातील एक स्टेडियम मुख्य शहराबाहेर आहे. मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न व डीवाय पाटील स्टेडियम (नवी मुंबई) तर पुण्यात गहुंजे स्टेडियमचे पर्याय विचाराधीन आहेत. मुंबई-पुण्यातच सामने खेळवले तर विमान प्रवासाचा प्रश्न नसेल, यावर बीसीसीआय बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली.
12-13 फेब्रुवारीला मेगा लिलाव
आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे दि. 12 व 13 फेब्रुवारी रोजी बेंगळूरमध्ये मेगा लिलाव होईल, असे बीसीसीआय पदाधिकाऱयाने यावेळी स्पष्ट केले. यंदाच्या मेगा लिलावासाठी रजिस्टेशनची मुदत दि. 20 जानेवारीपर्यंत होती.
बॉक्स
ख्रिस गेल, स्टोक्स, स्टार्क, आर्चरची माघार
विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल, इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स, ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज मिशेल स्टार्क, इंग्लिश खेळाडू जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स, अष्टपैलू सॅम करण यांनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. सॅम करणने दुखापतीतून सावरण्यासाठी, तसेच सरे क्रिकेट संघातर्फे पुढील हंगामाची तयारी करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे नमूद केले.
बॉक्स
केएल राहुलला 17 कोटी, हार्दिक पंडय़ा, रशीद खानला 15 कोटींचे मानधन
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील नवे प्रँचायझी अहमदाबाद व लखनौ संघांनी आपले तीन करारबद्ध खेळाडू शनिवारी जाहीर केले. अहमदाबादने हार्दिक पंडय़ा (15 कोटी), रशीद खान (15 कोटी), शुभमन गिल (8 कोटी) तर लखनौने केएल राहुल (17 कोटी), मार्कस स्टोईनिस (9.2 कोटी) व रवी बिश्नोई (4 कोटी) यांना करारबद्ध केल्याची माहिती दिली.
विक्रम सोळंकी यांची अहमदाबाद प्रँचायझीचे नवे क्रिकेट संचालक असतील, अशी घोषणा करण्यात आली. हार्दिक पंडय़ा या प्रँचायझीचे नेतृत्व साकारेल. याशिवाय, गॅरी कर्स्टन फलंदाजी प्रशिक्षक तर आशिष नेहरा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त आहेत.
लखनौचे नेतृत्व केएल राहुलकडे सोपवले गेले आहे. या प्रँचायझीने प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवरची यापूर्वीच नियुक्ती केली असून माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर मेंटर म्हणून कार्यरत असणार आहे.
यापूर्वी, हार्दिक पंडय़ाला मुंबई इंडियन्सने रिटेन केले नव्हते तर केएल राहुलने पंजाब किंग्स संघाशी फारकत घेत लिलावात उतरण्याचा निर्णय घेतला होता. 2021 हंगामात रशीद खान व शुभमन गिल हे अनुक्रमे सनरायजर्स हैदराबाद व केकेआर संघातून खेळले होते. रवी बिश्नोईने पंजाब तर मार्कस स्टोईनिसने दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.
बॉक्स
अनुभवी डेव्हिड वॉर्नर, रविचंद्रन अश्विनने बेस प्राईस वाढवली
ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन व विंडीजचा माजी अष्टपैलू डेव्हॉन ब्रेव्हो यांनी आपली बेस प्राईस 2 कोटी रुपयांपर्यंत वाढवली. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिशेल मार्श, भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना यांनीही आपली बेस प्राईस 2 कोटी रुपये नमूद केली. 2 कोटी रुपये बेस प्राईस कॅटेगरीत पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), शकीब हसन (बांगलादेश), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया), क्विन्टॉन डी कॉक (द. आफ्रिका), कॅगिसो रबाडा (द. आफ्रिका) यांचाही समावेश आहे.
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱया शाहरुख खानला 20 लाख या बेस प्राईसपेक्षा बरीच भरीव बोली लागू शकेल, असा होरा आहे. अमित मिश्रा, इशांत शर्मा, ऍरॉन फिंच, इयॉन मॉर्गन, डेव्हिड मलान, टीम साऊदी, जेम्स नीशम 1.50 कोटी रुपयांच्या बेस प्राईसमध्ये तर अजिंक्य रहाणे, कुलदीप यादव, टी. नटराजन, वणिंदू हसरंगा, एडन मॅरक्रम व तबरेझ शमसी 1 कोटी रुपयांच्या बेस प्राईस कॅटेगरीत आहेत.
बॉक्स
श्रेयस, चहल, वॉर्नरसाठी प्रँचायझींमध्ये चुरस शक्य
फेब्रुवारीत रंगणाऱया मेगा लिलावात भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर, फिरकीपटू यजुवेंद्र चहल व ऑस्ट्रेलियन डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांना करारबद्ध करण्यासाठी चुरस रंगू शकते, असे सध्याचे चित्र आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवन, इशान किशन यांच्यासह शार्दुल ठाकुर, दीपक चहर, हर्षल पटेल, अवेश खान, राहुल चहर यांनाही लक्षवेधी बोली लागू शकते. यातील भारतीय खेळाडूंना 7 ते 15 कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळू शकते, असे चित्र आहे.









