28 मे रोजी होणाऱया सर्वसाधारण बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित, ऑस्ट्रेलिया दौऱयापूर्वी आयपीएल घेण्यासाठी बीसीसीआयची चाचपणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर टाकण्याबद्दल आयसीसी गांभीर्याने विचार करत असून याबद्दल दि. 28 मे रोजी होणाऱया सर्वसाधारण बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. आयसीसीमधील एका विश्वसनीय सूत्राने हे स्पष्ट संकेत दिले आहेत. कोव्हिड-19 च्या महाप्रकोपामुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेवर यापूर्वीच अनिश्चिततेचे संकट होते. ते यामुळे आणखी गडद झाले आहेत. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, यंदाची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा दि. 18 ऑक्टोबर ते दि. 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणार आहे.
दि. 28 मे रोजी होणाऱया आयसीसी कार्यकारिणीच्या बैठकीत प्लेईंग कंडिशन्स आणि चेंडूला घाम, थुंकी, सॅलाईव्हा लावले जाते, त्याबद्दल काय करता येईल, यावर देखील विचारविनिमय होणे अपेक्षित आहे. आयसीसी इव्हेंटस कमिटीचे अध्यक्ष ख्रिस टेटली यावेळी काही पर्याय सूचवणार आहेत.
‘आयसीसी इव्हेंट कमिटीकडून आम्हाला तीन पर्याय अपेक्षित आहेत. यातील पहिला पर्याय म्हणजे 14 दिवस क्वारन्टाईनसह आणि प्रेक्षकांना सामावून घेत स्पर्धा पूर्वनियोजित रुपरेषेनुसारच खेळवणे, दुसरा पर्याय म्हणजे 14 दिवस क्वारन्टाईनसह व प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवणे व तिसरा पर्याय म्हणजे ही स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर टाकणे’, असे या सूत्राने गोपनियतेच्या अटीवर वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. याशिवाय, पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत तरी स्पर्धेचे फेरनियोजन करता येईल का, असाही पर्याय त्यांच्यासमोर असू शकतो.
शशांक मनोहर यांना मुदतवाढ मिळण्याचे संकेत
या बैठकीत शशांक मनोहर यांना मुदतवाढ देण्याबद्दलही विचार होईल. पण, टी-20 विश्वचषक स्पर्धेचे भवितव्य ठरवणे, हा मुख्य प्राधान्यक्रम असणार आहे. सध्याच्या घडीला क्रिकेट ऑस्ट्रेलिया व त्यांचे अव्वल खेळाडू यांची भारताविरुद्ध नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱया कसोटी मालिकेसाठी तयारीची मोहीम सुरु झाली आहे. ही स्पर्धा क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी आर्थिक दृष्टीने देखील विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
‘यंदाची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकली गेली तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची निश्चितच निराशा होईल. अर्थात, सरतेशेवटी आयसीसी ही संलग्न सदस्यांनी मूर्त स्वरुपात आहे आणि जर या सदस्यांना विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकणेच योग्य वाटत असेल तर त्याला कोणीही हरकत घेऊ शकणार नाही. सध्याच्या घडीला उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. पण, अर्थातच ही समस्या तात्कालिक आहे. जर यंदाची स्पर्धा 2022 मध्ये होत असेल तर त्याने काहीही नुकसान होणार नाही. कारण, जे उत्पन्न यंदा मिळणार असेल, ते दोन वर्षांनी मिळेल’, असे कार्यकारिणीतील सदस्याने पुढे सांगितले.
दरम्यान, गर्भश्रीमंत आयपीएल स्पर्धेला स्वतंत्र विंडो मिळणे आवश्यक असून कोव्हिड-19 वर वेळीच पूर्ण नियंत्रण मिळवता आले तर ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया दौऱयापूर्वी होऊ शकते, असा बीसीसीआयचा होरा आहे.
14 दिवसांच्या क्वारन्टाईनसाठी अनेक समस्या
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत. या सर्व संघातील सपोर्ट स्टाफ, टीव्ही कर्मचारी असा मोठा ताफा सोबत असतो. या सर्वांना 14 दिवस क्वारन्टाईन ठेवणे हे मोठे आव्हान असणार आहे. याशिवाय, ज्या देशात परिस्थिती पूर्वपदावर आलेली नसेल, कोव्हिड-19 चे थैमान किंचीतही शमलेले नसेल, तेथील संघांना प्रवास करणे सुरक्षिततेचे असेल का, याचाही आढावा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे, या सर्व घटकांनी 14 दिवस क्वारन्टाईन राहणे अर्थातच आव्हानात्मक असेल, हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची ही स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत लांबणीवर टाकणे, हा एक पर्याय आयसीसीसमोर असेल. पण, एकाच वर्षात, आयसीसीच्या दोन इव्हेंट, महिलांची विश्वचषक स्पर्धा भरवणे देखील फारसे रास्त नसेल. पुरुष गटातील तुलनेत महिला विश्वचषक स्पर्धेत फक्त 8 संघांचा समावेश असल्याने त्यांच्यासमोर इतक्या अडचणी असणार नाहीत.
असे आहेत आयसीसीसमोरील तीन पर्याय
पहिला पर्याय : स्पर्धा पूर्वनियोजित रुपरेषेनुसारच 14 दिवस क्वारन्टाईनसह प्रेक्षकांना सामावून घेत खेळवणे.
दुसरा पर्याय : स्पर्धा पूर्वनियोजित रुपरेषेनुसारच 14 दिवस क्वारन्टाईनसह प्रेक्षकांशिवाय खेळवणे
तिसरा पर्याय: परिस्थिती सुधारण्याची प्रतीक्षा करण्यासाठी स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत लांबणीवर टाकणे
चौथा पर्याय : कोणताही धोका न स्वीकारत स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर टाकणे.









