अलीकडे बैलपातीच्या मळण्या झाल्या दुर्मीळ : बैलांच्या जागी आली ट्रक्टर, पॉवर ट्रिलरसारखी विविध आधुनिक यंत्रे
पिराजी कूऱहाडे /खानापूर
दसरा-दिवाळी आली की भात सुगीचे दिवस सुरू होतात. वर्षभर कष्ट करून घरात येणारे धान्य ही वर्षाच्या उपजिविकेची बिदगी ठरते. परंपरागत शेतीपद्धतीत शेतात पिकणारे धान्य हे मान्सूनवर आधारित असते. घरातील कर्त्या पुरुषाने आलेल्या भाताची लोंब आणायची, ती भरडून जुन्या तांदळात टाकायची. भात नवं करायचं आणि सुगीला सुरुवात करायची असा पारंपरिक रितीरिवाज पूर्वापारपासून चालत आला आहे. परंपरागत शेती पद्धतीतील ते दिवस अन् शेतकऱयांच्या जिवावर जगणारी ती मंडळी आता केवळ एक आठवण राहिली आहेत.
अलीकडच्या काळात शेतीपद्धतीत बरेच बदल होत आहेत. आपल्या कुटुंबाला पुरेल इतकेच भात पिकवायचे अशी पद्धत सुरू झाली आहे. यांत्रिक शेती सुरू झाली, रात्रीची मळणी बंद झाली. अन् सुगीतील गोडवा संपत आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आता सुगी कधी सुरू झाली आणि कधी संपली हे देखील कळत नाही. खळी बंद झाली, खळय़ाच्या मळण्या बंद झाल्या. आता यंत्रोपकरणाने ती जागा घेतली आहे.
अलीकडच्या काळात भात कापणीसह मळण्या सोप्या झाल्या आहेत. बैल पातीच्या आधारे मळण्या करण्याचा आनंद वेगळाच होता. अलीकडे बैलपातीच्या मळण्या दुर्मीळ होत चालल्या आहेत. कारण बैलांच्या जागी अलीकडे ट्रक्टर, पॉवर ट्रिलरसारखी यंत्रोपकरणे आल्याने शेती करणे सोपे झाले आहे. त्यामुळे लहान शेतकरी बैलजोडय़ा बाळगणे टाळत आहेत. शिवाय बैलजोडय़ांच्या पोषणाचा खर्च पाहता अनेक शेतकरी ट्रक्टरांचाच आधार घेऊन शेती करत आहेत.
दोन-तीन दशकापूर्वी सुगीचे दिवस आले की पंधरा दिवस खुरपी, दोऱया, पोती, सूप याची जुळवाजुळव करणे, जुन्या पद्धतीच्या कणग्या, तट्टे, भाताची टोपली शेणाने सारवून घ्यायच्या. सुगी सुरू होणार म्हटल्यावर शेतात खळे करण्याची घाई सुरू व्हायची. खळय़ाच्या जागा वर्षानुवर्षे ठरलेल्या असायच्या. महिलांनी दिवसभर भात कापायचे, पुरुषांनी ते भारे बांधून खळय़ावर आणायचे आणि व्यवस्थित रचायचे. खळय़ावर गोलाकार भात पसरून पातीला बांधलेली बैलांची दावन फिरायला सुरू व्हायची.
या मळण्या पहाटेपर्यंत सुरू असायच्या. पिंजर बाजूला करून मळणी केलेले भात गोळा करायचं, सकाळी भात वारे द्यायचे. भाताची रास करून पोती भरायची. तसेच भरलेली पोती घरात आली की आरती ओवाळून धान्याची पूजा करायची. पण आता अनेक शेतकरी खळय़ातच वजन काटा लावून घरी येणारी सुगी परंपरा पैशात मोजताना दिसत आहेत.
खळय़ांची जागा घेतली तट्टांनी
सुगीच्या काळात वर्षभर लागणारी शेतीची अवजारे तयार करणारे सुतार, लोहार लोक खळय़ावर भात न्यायला यायचे. देवाच्या पालखीचे मानकरी असणारे हरिजन, मातंग, नाभिक, गुरव असे सर्वच लोक खळय़ावर भात न्यायला यायचे. पण आता शेणाने सारवण करून होणाऱया मळण्यांच्या खळय़ांची जागा तट्टांनी घेतली आहे. प्रत्येक शेतकऱयाच्या घरात मळणीसाठी तट्टांची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेणाने सारवण करून भातमळण्या करण्याची परंपरा आजही काही भागात असली तरी यंत्रोपकरणाच्या काळात ही परंपरा लोप पावत चालली आहे.









