प्रतिनिधी/ बेंगळूर
विश्वविख्यात म्हैसूर दसरोत्सवात विजयादशमीदिनी होणाऱ्या जम्बो सवारी पाहण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक म्हैसूरमध्ये दाखल झाले आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते जम्बो सवारीला चालना दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे सायंकाळी मशाल मिरवणूक व इतर कार्यक्रमाही होणार आहेत.
750 किलो वजनाच्या सुवर्ण अंबारी वाहून नेण्याची जबाबदारी यंदा देखील ‘अभिमन्यू’ हत्तीवर सोपविण्यात आली आहे. सायंकाळी 4:40 वाजता राजवाडा आवारात अंबारीतील चामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीवर सिद्धरामय्या पुष्पवृष्टी करतील. त्यानंतर जम्बोसवारी सुरू होईल. तत्पूर्वी दुपारी 1: 45 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजवाडा आवारातील बलराम दरवाजाजवळील नंदीध्वजाची पूजा केली जाणार आहे.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, म्हैसूरचे राजवंशज यदूवीर कृष्णदत्त चामराज वडेयर, जिल्हा पालकमंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा व इतर मान्यवर उपस्थित राहतील. सायंकाळी बन्नी मंटप मैदानावर पोलीस खात्याकडून टॉर्च लाईट परेड (मशाल मिरवणूक) होणार आहे. म्हैसूर राजघराण्यातील परंपरेनुसार राजवाडा आवारात सकाळी मुष्ठीयुद्ध होईल. तसेच इतर धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमही होणार आहेत.









