प्रतिनिधी / म्हापसा
तौक्ते वादळामुळे संपूर्ण गोव्यात पाणी व वीजपुरवठा खंडित झाला होता. काही भागात हा पुरवठा हळूहळू सुरळीत झाला. म्हापसा खोर्लीतील वॉर्ड क्र. 15 ते 17 मध्ये बुधवारी पाणीपुरवठा सुरळीत झाला. परंतु वीजपुरवठा आश्वासन देऊनही सुरळीत न झाल्याने संतप्त नागरिकांनी वीज खात्याच्या म्हापसा उपकेंद्रावर धडक दिली. वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत आम्ही इथेच ठाण मांडून बसणार असल्याचा इशारा अधिकाऱयांना दिला. मात्र वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर आंदोलक घरी परतले.
गेले पाच दिवस खोर्ली परिसरात शिंदे फॅक्टरी, सारस्वत विद्यालय, श्री गणेश मंदिर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांची भंबेरी उडाली. रात्रीच्यावेळी लोक उकाडय़ाने हैराण झाले. वीज खात्यात चौकशी केल्यास लाईनमन येथील. सर्वत्र दुरुस्ती चालू आहे, अशी उत्तरे दिली जात होती. 18 रोजी काही लोकांनी लाईनमन व टेक्नीकला बरोबर घेऊन ट्रान्स्फॉर्मरजवळ नेले असता नसल्याचे सांगतिले. काल दुपारी 2 वा. पर्यंत वीजपुरवठा होईल असे आश्वासन दिले. तरी 3 वा. पर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने संतप्त नागरिकांनी वीज उपकेंद्र गाठले. त्यावेळी नारायण राठवड, देवेश शिंदे, रामकृष्ण फडते, प्रवीण आसोलकर, तुषार शिंदे, पवन नाईक, साईश राठवड, विशांत शिंदे, गौरीश राठवड, सिद्धार्थ शिंदे, कुशल धामस्कर, चंदन सावंत, प्रणय तिवरेकर यांनी प्रश्नांचा भडिमार केला. मात्र उपस्थित अधिकारी उत्तरे देऊ शकत नव्हते. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत झाल्याशिवाय इथून हलणार नाही असे सांगून तिथेच ठाण मांडले. वीज सुरळीत झाल्यानंतर सर्वजण घरी परतले.









