प्रतिनिधी/ मडगाव
म्हादईवर गोव्याचे पर्यावरण अवलंबून आहे. म्हादईच्या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करणे, गोव्याला प्रचंड त्रासदायक ठरणार आहे. म्हादईसाठी सर्व हवेदावे बाजूला ठेऊन सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे. त्यासाठी गोव्यातील सांस्कृतिक संस्थांनी देखील पुढाकार घेण्याची वेळ आल्याचे उद्गार राज्याचे माजी वित्तसचिव दौलत हवालदार यांनी काल मडगावात बोलताना काढले.
गोमंत विद्या निकेतन संस्थेच्या 108व्या वर्धापनदिन समारंभ दौलत हवालदार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्या हस्ते ‘आजचा व कालचा गोमंतक’ दि गोवा हिंदु असोसिएशन, मुंबई यांचे मुळ प्रकाशन, ‘गोमंतक परिचय’ लेखक बाळकृष्ण वामन सावर्डेकर, ‘ज्ञानदेवी-शब्दकोश’-लेखक रामचंद्र विष्णू माडगांवकर आणि ‘रवींद्र दर्शन’ लेखक वि. स. सुखटणकर या दुर्मिळ ग्रंथांचे पुनःप्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेचे जर्नादन वेर्लेकर, उपाध्यक्ष सुहास नायक व डॉ. सोमनाथ कोमरपंत इत्यादी उपस्थितीत होते.
याच कार्यक्रमात संस्थेच्या साहित्य पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यात ज्ञानदा प्रभुदेसाई (बालसाहित्य), दामोदर काणेकर (नाटक), श्रीकृष्ण केळकर (चरित्र), दीपा मिरींगकर (कविता) व आसावरी कुलकर्णी (कविता) यांना श्री. हवालदार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या शिवाय संस्थेच्या चार प्रतिष्ठित वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यंदाचे विजेते होते, सर्पमित्र अमृत सिंग (केशव अनंत नायक स्मृती समाजसेवक पुरस्कार-2019), ग्लेडा फर्नांडिस (पिरूबाय दलाल स्मृति स्वयंसिद्धा पुरस्कार-2019), संस्था : इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक ऍसिस्टंट (प्रोव्हेदोरिया) : काशिनाथ दामोदर नायक स्मृती सामाजिक कृतज्ञत्ता पुरस्कार-2019 व दासू वैद्य (कविवर्य दामोदर अच्युत कारे गोमंतदेवी पुरस्कार-2019). सर्पमित्र अमृत सिंग व ग्लेडा फर्नांडिस यांनी उपस्थितीत राहून पुरस्कार स्वीकारले तर दासू वैद्य हे कोरोना महामारीमुळे या कार्यक्रमाला उपस्थितीत राहू शकले नाही. त्यांनी चित्रफित पाठवून कविवर्य दामोदर अच्युत कारे गोमंतदेवी पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आल्याने गोमंत विद्या निकेतनचे आभार मानले.
गोव्यात आज ड्रग्सचे प्रमाण वाढले आहे. विदेशी पर्यटक गोव्यात स्वस्त दरात ड्रग्स मिळत असल्याने या ठिकाणी येत असतात. आज पर्यटकांबरोबरच स्थानिक युवा पिढी ड्रग्सच्या आहारी जात आहे ती चिंताजनक बाब आहे. गोव्यातील हायस्कूल, कॉलेजीस् इत्यादी पर्यंत ड्रग्स पोचले आहेत. त्यामुळे भावी पिढीसाठी हे धोक्याचे असून सर्वांनी जागृत होण्याची वेळ आल्याचे मत देखील श्री. हवालदार यांनी पुढे बोलताना मांडले. यावेळी त्यांनी गोमंत विद्या निकेतन संस्थां राबवित असलेल्या विविध उपक्रमाबद्दल संस्थेचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. केशव अनंत नायक स्मृती समाजसेवक पुरस्कार विजेते सर्पमित्र अमृत सिंह यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्राणी बचाव पथक संस्था ही आपली एकटय़ाची नाही तर गोव्यात विविध भागात त्यासाठी काम करणाऱया युवक तसेच शेजारील कर्नाटक व महाराष्ट्रतील मुले मिळून ही संस्था आहे. आज जवळपास 400 ते 500 कार्यकर्ते त्या सर्वांचा हा पुरस्कार आहे. आपल्या संस्थेचे कार्यकर्ते दिवस-रात्र प्राणी बचाव मोहिमेत कार्यरत असतात. आपण स्वता गेली 25 वर्षे त्यासाठी कार्यरत असून या कार्याला आजवर कोणतीच बाधा आलेली नाही.
सौ. दैवकी राजेश नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.









