मात्र आणखी पाणी वळवू देणार नाही, विषय पंतप्रधान, गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचला
प्रतिनिधी/ पणजी
म्हादईचे पाणी वळवण्यात आले असून त्याचा परिणाम गोव्यातील प्रवाहावर झाल्याची कबुली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन ठरावाच्या चर्चेत बोलताना दिली. कर्नाटकला आणखी पाणी वळवू देणार नाही आणि कर्नाटक यापुढे पाणी वळवू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कणकुंबी ते मलप्रभा या भागात 2008 ते 2012 पर्यंत भूमिगत नाले बांधण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. म्हादईचे पाणी गोवा सरकारसाठी महत्त्वाचे असून सध्या हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ठ आहे तसेच तो पंतप्रधान, गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याचे ते म्हणाले.
संजीवनी कारखान्याबाबत अंतिम निर्णय नाही
विरोधी आमदारांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर डॉ. सावंत यांनी भाष्य करताना सांगितले की, संजीवनी साखर कारखान्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. ऊस शेतकऱयांना विश्वासात घेऊन काय ते ठरविण्यात येईल. सध्या रु. 25 कोटी प्रती वर्षी त्या कारखान्यास सरकार देते. 31 मार्चपर्यंत पिण्याच्या पाण्याची समस्या सुटेल तर मे महिन्यापर्यंत गरजूंना शौचालये देण्यात येतील, अशी ग्वाही डॉ. सावंत यांनी दिली.
चांगल्या कामांबाबत कोणी शाबासकी देत नाही
काही विकासकामांना उशीर झाला परंतु ती बंद करण्यात आलेली नाहीत तसेच सर्व कल्याणकारी योजना सुरु असल्याचे ते म्हणाले. सरकारवर विरोधी पक्ष, आमदार टीका करतात तसेच पोलिसांवरही ठपका ठेवतात परंतु सरकारच्या, पोलिसांच्या चांगल्या कामगिरीसाठी कोणी शबासकी देत नाही, अशी खंत त्यांनी प्रकट केली.
पर्यटकांसाठी केली अनेक साधनसुविधांची निर्मिती
गोव्यात अनेक प्रश्न आहेत परंतु ते एकाचवेळी सुटणार नाहीत. त्यासाठी थोडा वेळ लागणारच. सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सरकार करीत असून हे सरकार गोव्यातील सर्व लोकांचे आहे. गोव्याचे पर्यटन किरकोळपणे मंदावले तरी अनेक ठिकाणी पर्यटकांसाठी साधनसुविधा निर्माण करण्यात आल्या. त्या क्षेत्रात गोव्याने पुरस्कारही मिळवले, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
ड्रग्ज, गुन्हेगारीत 85 टक्के परप्रांतीयांचा भरणा
गोव्यात अमलीपदार्थ नाहीत असे नाही. ते आहेत म्हणूनच पकडले जातात. त्यांची योग्य ती विल्हेवाट लावली जाते. शिवाय गुन्हेगारी क्षेत्रात 85 टक्के परप्रांतिय असल्याचा दावाही त्यांनी केला. मडगांवचे जिल्हा इस्पितळ लवकरच सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले.
योजना अधिकधिक शेतकऱयांपर्यंत पोहोचवा : सोपटे
शेतकरी शेतात काम करण्यास तयार आहेत पण खाजन शेती बुडवून शेताची नाशाडी केली जाते. गोवा कृषीप्रधान होण्यासाठी सरकारने गंभीर दखल घ्यावी, असे ते म्हणाले आपल्या एकाच गावात 800 शेतकरी आहेत पण प्रधानमंत्री फसल योजनेचा लाभ पूर्ण गोव्यात केवळ 740 शेकऱयांनी घेतला. योजना शेतकऱयांपर्यंत पोहचणे आवश्यक असल्याने फक्त 2756 मनरेगा काम करणारे आहेत ही योजना शेतकऱयापर्यंत पोचवावी, त्यांना दुहेरी मदत होईल, असे मांद्रेचे मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद मांद्रेकर म्हणाले. गोव्यातील 6 नद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचे ठरवले आहे. रेती काढणाऱयांना या योजनेत समावून घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. आल्वारा जमीन विकण्याचा सपाटा सुरु झाला आहे, असेही ते म्हणाले.
काणकोण तालुक्याच्या समस्या सोडवा : इजिदोर फर्नांडिस
खोतीगांव, गांवडोंगरी या ठिकाणी मोबाईल चालत नाही. लँडलाईन नाही. या गावातील संपर्क तुटला आहे. ही गावे अभयारण्यात येतात त्यामुळे तेथील लोकांना घरे बांधता येत नाही शेतही करता येत नाही. गावांतील लोकांना वन खात्याने नोकरी दिली आहे पण त्यांना अनेक वर्षे कंत्राटी कामगार म्हणून ठेवले आहे. त्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी केली. राष्ट्रीय हमरस्ता तयार झाल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली असे सांगून त्यांनी मंत्र्यांचे अभार मानले. पावसाळ्यात झाडे पडतात आणि विजेच्या तारा तुटतात. पावसाळ्यापूर्वी आताच काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱयांवर शौचालय देण्याची योजना तयार आहे, त्याचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
एक चौदाच्या उताऱयावरील नावाचा एकही माणूस जीवंत नाही : टोनी
हमरस्त्यावर गतिरोधक विचित्र पद्धतीने घालण्यात आले आहेत. लोकांना पाठीच्या कण्याचा त्रास होत आहे. अपघातही वाढत आहेत असे आमदार टोनी फर्नाडिस म्हणाले. खाजन शेतकरी कूळसंघटनांतील गोंधळ सोडवण्याची मागणी त्यांनी केली. एक चौदाच्या उताऱयावर ज्याचे नाव आहे त्यालाच संघटनेचा पदाधिकारी बनता येते. वडिल वारले त्यांचे नाव या उताऱयात होते. आता न्यायालयीन वाद असल्याने नवी नावे घालायचे नाही, सध्या एक चौदाच्या उताऱयावर कूळ म्हणून लागलेला एकही शेतकरी जीवंत नाही. त्यामुळे समिती स्थापन होऊ शकत नाही यावर सरकारने लक्ष द्यावे असे ते म्हणाले.









