प्रतिनिधी/ चिपळूण
गुहागर तालुक्याकडे येणाऱया चाकरमानी आणि त्यांच्या वाहनांच्या तपासणी व चौकशीसाठी चिपळूण-गुहागर मार्गावरील मार्गताम्हाने-बोऱया फाटा येथे चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. मात्र येथे विजेची कोणतीच सोय नसल्याने गेल्या चार दिवसांपासून येणाऱया चाकरमानी, वाहनांची तपासणी आणि क्वारंटाईनचा शिक्का रात्रीच्यावेळी मोबाईमधील बॅटरीच्या प्रकाशातच मारला जात आहे.
मुंबईहून मोठय़ा प्रमाणात चाकरमानी येत आहेत. त्यामुळे बोऱया फाटय़ावरील या चेकपोस्टवर 24 तास शासकीय कर्मचारी व पोलीस कार्यरत आहेत. त्यांच्याकडून येणाऱया वाहनांची चौकशी सुरु आहे. जे चाकरमानी कन्टेन्मेंट झोन (विषाणूबाधीत क्षेत्र) मधून येत आहेत अशांची नोंदणी करुन त्यांना त्यांच्या भागातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवण्यात येत आहे. तसेच जे नॉनकन्टेन्मेंट झोनमधून आले आहेत अशांना त्यांच्या घरामध्येच विलगीकरण व्हावे, असे सांगून त्यांच्या हातावर शिक्का मारला जात आहे. शिवाय ज्यांना त्यांच्या गावात जायचे आहे त्यांना छापील अर्ज देण्यात येऊन तो अर्ज स्थानिक प्रशासन किंवा ग्रामसुरक्षा दल यांना दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, चेकपोस्ट सुरू झाल्यापासून तेथे कार्यरत कर्मचाऱयांच्या अडचणींत वाढ झालेली आहे. सुरूवातीला मार्गताम्हाने बाजारपेठेजवळ असलेला हा चेकपोस्ट बोऱया फाटय़ावर हलवण्यात आल्यानंतर या अडचणीत अधिक वाढ होत गेली. पाण्याची व्यवस्था नाही. मोठय़ा प्रमाणात चाकरमानी येत असल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत. त्यातून प्रवास करणाऱयांसाठी कोणत्याच सुविधा नाहीत. वीज नसल्याने तर रात्रीच्यावेळी मोठी अडचण निर्माण झाली आहे. तेथे जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र तो नादुरूस्त झाल्याने अखेर कर्मचाऱयांना रात्रभर आपल्या जवळच्या मोबाईच्या बॅटरीच्या प्रकाशात कागदपत्रांची तपासणी आणि क्वारंटाईनचा शिक्का मारण्याची वेळ आली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या भेटीत तेथील गैरसोय लक्षात घेतल्यानंतर तत्काळ महावितरणला येथे विजेची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यासाठी चार विद्युत खांब लागणार असल्याने खर्चाच्या तरतुदीचा प्रश्न पुढे आला. शेवटी आपल्या आमदार निधीतून खर्च करण्यास परवानगी दिल्यानंतर मंगळवारपासून वीज जोडणीचे काम सुरू झाले आहे. दोन दिवसांत वीज येईल, असे सांगितले जात आहे.









