नड्डा, अमित शहा यांची आमदारांना सूचना : पंतप्रधानांच्या भेटीसाठी पुन्हा जाणार दिल्लीत
विशेष प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातून दिल्लीस गेलेल्या आमदारांच्या शिष्टमंडळाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल सोमवारी सायंकाळी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये दाखल झालेल्या 8 पैकी 7 आमदार उपस्थित होते. त्यांना या दोन्ही नेत्यांनी आशीर्वाद दिले. मोदी, सावंतांचे हात बळकट करा, अशी सूचना केली. पंतप्रधान अतिशय व्यस्थ होते. त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे हे सर्व नेते मंडळी रात्री उशिरा गोव्यात दाखल झाली. पंतप्रधानांच्या भेटीसाठी ही मंडळी पुन्हा दिल्लीला जाणार आहेत.
प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी नवी दिल्लीहून या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की हा दिल्ली दौरा केवळ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सदिच्छा भेटीचा होता.
पंतप्रधानांशी भेट नाही
पंतप्रधान दोन – तीन दिवस विविध पूर्व नियोजित कामांमध्ये व्यस्थ असल्याने त्यांच्या भेटीची वेळ मागाहून मिळणार असल्याने दिल्लीला राहण्याऐवजी आम्ही गोव्यात येणेच पसंत केल्याचे स्पष्ट केले. रात्री उशिरा विमान पकडून ही सर्व मंडळी मध्यरात्री उशिरा गोव्यात परतली.
दिल्ली दौऱयात दिगंबर कामत, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस आणि राजेश फळदेसाई या आमदारांचा समावेश होता. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर हे देखील यावेळी उपस्थित होते.
नड्डा, शहा यांच्याकडून स्वागत
दिल्ली दौऱयात पक्षाध्यक्ष जयप्रकाश नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एकत्रितच भेट झाली आणि दोन्ही नेत्यांनी काँग्रेसहून भाजपमध्ये दाखल झालेल्या सर्व आमदारांचे जोरदार स्वागत केले.
मायकल लोबो आफ्रिका दौऱयावर
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर असलेले कळंगूटचे आमदार मायकल लोबो हे दिल्लीत पोहोचू शकले नाहीत, मात्र त्यांच्या पत्नी डिलायला लोबो या दिल्ली दौऱयात होत्या.
दोन्ही जागांवर घवघवीत यश मिळवा
अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांनी गोव्यात डॉ. प्रमोद सावंत व नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्न करा. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करुन दोन्ही जागांवर भाजपला घवघवीत यश प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही दोन्ही नेत्यांनी उपस्थितांना केले.
मंत्रिमंडळ फेररचनेवर चर्चा नाही : तानावडे

अमित शहा व जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेमध्ये आता पुढे सरकारमध्ये कोणते फेरबदल करायचे वगैरे कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही, असे तानावडे यांनी सांगितले. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून कामाला लागा, अशी सूचना त्यांनी केली व गोव्यातील कार्याची माहिती त्यांनी जाणून घेतली, असे तानावडे पुढे म्हणाले.









