मच्छे येथील घटना : वृद्ध आईसमोरच कुऱहाडीने घातला घाव, आरोपीला अटक
प्रतिनिधी / बेळगाव
वृद्ध आईसमोर मोठय़ा भावाने आपल्या लहान भावाचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री उशीरा लक्ष्मीनगर-मच्छे येथे घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपीला काही तासातच अटक केली आहे.
बसवराज शिवपुत्र तळवार (वय 41, रा. लक्ष्मीनगर-मच्छे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मोठा भाऊ राजू तळवार (वय 44) याने बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कुऱहाडीने घाव घालून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी राजूला अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. यासंबंधी 74 वषीय आई शिवाक्का हिने पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी राजूला अटक करुन खुनासाठी त्याने वापरलेली कुऱहाड जप्त केली.
उपलब्ध माहितीनुसार राजू लहान भाऊ बसवराज व आई शिवक्का हे एकत्र राहत होते. गेल्या सात वर्षांपूर्वी राजूची पत्नी माहेरी गेली आहे. त्यामुळे हे तिघे जण मिळून राहत होते. लहान भाऊ बसवराज नेहमी घर विकण्याचे बोलत होता. बुधवारी रात्रीही घर विकण्यासंबंधिची चर्चा सुरू झाली. त्यामुळे सख्या भावांमध्ये भांडण जुंपले. भांडणानंतर राजूने कुऱहाडीने वार करुन बसवराजचा खून केला.
पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी बसवराजचा मृतदेह रक्ताच्या थारोळय़ात पडला होता. गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. एका मुलाचा खून झाला दुसरा मुलगा खुनाच्या आरोपातून कारागृहात गेला. आता वृद्ध आई एकाकी पडली आहे.









