वृत्तसंस्था /सॅनफ्रान्सिस्को :
मागील खूप दिवसांपासून प्रतिक्षेत असणारा मोटोरोलाचा 5 जी फोल्डेबल स्मार्टफोन अखेर सादर करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांची प्रतीक्षा समाप्त होणार असल्याचे पहावयास मिळाले आहे. मोटोरोला कंपनीकडून 5 जी फोन नवीन डिझाईन आणि अत्याधुनिक फिचरसोबत सादर करण्यात आला आहे. सदरचा फोन हा मागील वर्षात सादर केलेला मोटोरोला रेजरमधील सुधारीत आवृत्तीतला असून यामध्ये 6.2 इंचाचा प्लास्टिक ओल्ड मेन डिस्प्ले आणि 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेंसरसोबत सादर केला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
सदर फोनमध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रगन 765 जी प्रोसेसर मिळणार असून 5 जी कनेक्टिविटीसोबत जोडण्यास मदत मिळणार असल्याचे म्हटले आहे. मॉडेल तीन रंगासोबत सादर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 2800 एमएएच क्षमतेची बॅटरीही सोबत मिळणार आहे.
मोटोरोला रेजर 5 जी मध्ये एकमेव 8 जीबी रॅम आणि 265 जीबी स्टोरेज मॉडेल दाखल केले आहे. या स्मार्टफोनची किमत अमेरिकेमध्ये 1.02 लाख रुपये राहणार आहे. ब्लश गोल्ड, पॉलिश्ड ग्रेफाइट आणि लिक्विड मर्करी या रंगात फोन उपलब्ध होणार आहे.
मोटोरोलाचा स्मार्टफोन हा सर्वात पहिल्यांदा चीन आणि युरोपीय बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व आणि लॅटिन अमेरिकेच्या क्षेत्रासह अन्य बाजारामध्ये हा स्मार्टफोन सादर होण्याचे संकेत आहेत.









