मार्केट पोलिसांची कारवाई, 8 दुचाकी जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
शहर व उपनगरांत मोटारसायकली चोरल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी बुधवारी एका चौकडीला अटक केली आहे. त्यांच्या जवळून 2 लाख 95 हजार रुपये किमतीच्या 8 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, पोलीस उपनिरीक्षक एम. एस. वटारे, लक्ष्मण कडोलकर, एस. टी. तेली, आसीर जमादार, मारुती चावडी, व्ही. बी. माळगी, एस. एन. पात्रोट, आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
अक्षय अशोक तांदळे (वय 22, रा. येळ्ळूर रोड), प्रसाद अशोक पाटील (वय 24, रा. राजारामनगर, उद्यमबाग), ओंकार श्रीकांत इंगळे (वय 25, रा. चव्हाट गल्ली), शुभम राजू वाडकर (वय 22, रा. कोळी गल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. भा.दं.वि. 379 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
शहर व उपनगरांत मोटारसायकली चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दुचाकी चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ही चौकडी मार्केट पोलिसांच्या जाळय़ात अडकली आहे. त्यांनी वेगवेगळय़ा भागातून चोरलेल्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.
15 दिवसांतील दुसरी कारवाई
मार्केट पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी मोटारसायकली चोरणाऱया एका तरुणाला अटक करून 1 लाख 95 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या होत्या. चंद्रू हरीजन (वय 25, रा. रुक्मिणीनगर) असे त्याचे नाव आहे. 15 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली होती. बुधवारी आणखी चौघा जणांना अटक करून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.