‘लॉकअप डेथ’ प्रकरणी सीआयडीचे पथक लवकरच बेळगावात
प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारी पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या बसनगौडा यल्लनगौडा पाटील (वय 45) याला बेल्लद बागेवाडीहून बेळगावला कसे आणले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोटारसायकलवरून त्याला बेळगावला आणल्याची माहिती मिळाली आहे.
गांजा प्रकरणात एफआयआर दाखल झाला होता. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल झालेल्या गुह्यात त्याला अटक झाली नव्हती. म्हणून त्याला पकडण्यासाठी पोलीस मोटारसायकलवरून बेल्लद बागेवाडीला गेले होते, अशी माहिती मिळाली आहे.
शनिवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी केल्यानंतर बसनगौडाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर तो बेल्लद बागेवाडीला नेण्यात आला. बेळगावहून बेल्लद बागेवाडीपर्यंत साध्या वेशातील पोलीस पाठविण्यात आले होते.
उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होण्याआधी न्यायदंडाधिकाऱयांनी शवागाराला भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली. पोलीस अधिकारी व कुटुंबियांकडून त्यांनी या घटनेसंदर्भात माहिती घेतली आहे. नियमानुसार हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले असून एक-दोन दिवसांत सीआयडीचे अधिकारी बेळगावला येणार आहेत.
एकंदर प्रकरणामध्ये संशयाचे वलय अधिक गडद झाले आहे. पोलीस अधिकाऱयांनी कुटुंबियांना दिलेली चुकीची माहिती, सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रकार पाहता कुटुंबियांची दिशाभूल करण्यात आली का? असा संशय बळावला आहे. पत्रकारांनी बसनगौडा यांची मुलगी रोहिणी यांच्याशी संपर्क साधून ‘प्रकरण मिटविण्यासाठी तुमच्यावर दबाव घातला का?’ असा प्रश्न विचारला असता कोणाचा दबाव नाही. मात्र चुकीची माहिती दिली गेली आहे, असे तिने सांगितले.
सीबीआय चौकशीची मागणी
आम आदमी पक्षाचे उत्तर कर्नाटक विभागाचे प्रमुख राजकुमार टोपण्णावर यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. चौकशी सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण सीआयडी ऐवज सीबीआयकडे सोपवून कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली असून दोषी अधिकारी व पोलिसांवर कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.









