जॉर्ज ऑलीवर याच्यावर पोलिसांचा संशय
प्रतिनिधी / पणजी
मेरशी येथे एका युवकावर गोळी झाडून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल सोमवारी घडली असून ओल्ड गोवा पोलिसांनी संशयित जॉर्ज ऑलीवर याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. जखमी प्रसाद फडते या युवकाला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या युवकावर गोळी झाडण्यात आली तो प्रसाद फडते माशेल येथील आहे. पोलिसांनी तपासकामाला सुरुवात केली असून संशयिताची ओळखही मिळाली आहे. जॉर्ज ऑलीवर असे संशयिताचे नाव असून लवकरच त्याला अटक केले जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.
कामगारामुळे झाले दोघांत भांडण जॉर्ज ऑलीवर याचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय असून प्रसाद फडते याचाही पोल्ट्री फार्मचा व्यवसाय आहे. प्रसाद याच्याकडे काम करीत असलेल्या कामगाराने जॉर्ज ऑलीवर याच्याकडे काम करायला सुरु केले होते. सदर कामगार प्रसादचे पैसे देणे असल्याने प्रसाद कामगाराला नेण्यासाठी मेरशी येथे आला होता. कामगाराला नेत असल्याने जॉर्ज ऑलीवर व प्रसाद यांच्यात भांडण झाले. त्याच दरम्यान जॉर्ज याने प्रसादवर गोळी झाडली. गोळी प्रसादच्या हाताला लागली व तो जखमी झाला. नंतर जॉर्ज याने घटनास्थळावरून पळ काढला.








