22 डिसेंबरला बाजारात होणार लिस्ट : 1 हजार कोटी उभारण्याची तयारी
मुंबई
देशातील सर्वात मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या मेट्रो ब्रँडस् लिमिटेडचा आयपीओ येत्या 10 डिसेंबरला खुला होणार आहे. सदरचा आयपीओ 14 डिसेंबर रोजी बंद होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कंपनीने आपला इश्यू 22 डिसेंबरला भारतीय शेअर बाजारात बीएसई आणि एनएसई निर्देशांकावर लिस्टेड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. आयपीओ अंतर्गत सध्याचे समभागधारक आणि प्रवर्तकांकडून 21.45 दशलक्ष समभाग विक्रीचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता सांगितली जात आहे. या आयपीओच्या माध्यमातून 1 हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी कंपनीने चालविली आहे.
होणार नवी स्टोअर्स सुरू
मलीक तेजानी हे मेट्रो ब्रँडस् लिमिटेडचे संस्थापक आहेत. मेट्रो ब्रँडस् लिमिटेडची देशभरातील शहरांमध्ये पादत्राणांची शोरूम्स ‘मेट्रो शूज’च्या नावाने कार्यरत आहेत. इश्यूच्या माध्यमातून 225 कोटी रुपये उभारले जाणार असून याचा वापर आगामी काळात विविध शहरात नवीन स्टोअर्स सुरू करण्यासाठी केला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









