बेळगाव / प्रतिनिधी
भारतावर राज्य करण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी येथील गुरूकुल शिक्षण पद्धत मोडीत काढून मेकॉले प्रणित ‘कारकून’ सिद्ध करणारी शिक्षण पद्धत भारतात आणली. त्यामुळे मेकॉले प्रणित शिक्षण पद्धत भारतीय संस्कृतीच्या ऱहासाला कारणीभूत आहे, असे परखड मत हिंदूत्वनि÷ प्रशांत गाळीमठ यांनी व्यक्त केले. छत्रेवाडा अनसुरकर गल्ली येथे आयोजित जिल्हा हिंदू राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. रविवारी या अधिवेशनाचा समारोप झाला.
भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचिन आणि महान संस्कृती आहे. यात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचे आचरण कसे असावे आणि आपल्या जन्माचे सार्थक कसे करावे हे ऋषिमुनींनी वेद – उपनिषदांमध्ये लिहून ठेवले आहे. त्याचे पालन करूनच भारतात आदर्श अशी गुरूकुल शिक्षण पद्धती होती. मात्र इंग्रजांनी ही पद्धत मोडीत काढली, असे गाळीमठ यांनी यावेळी सांगितले.
शनिवार आणि रविवारी झालेल्या या दोन दिवसीय जिल्हा हिंदू राष्ट्र अधिवेशनात विविध हिंदूत्वनि÷ संघटना, पक्ष, संप्रदाय, अभियंता, उद्योजक, पुरोहित, मंदिर विश्वस्त यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बेळगावसह रायबाग, गोकाक, खानापूर, रामनगर, नंदिहळ्ळी येथूनही कार्यकर्ते सहभागी झाले होते. या अधिवेशनात 20 अधिवक्ता सहभागी झाले होते. अधिवेशनात सचिन चव्हाण यांनी ‘माहिती अधिकार’ कायद्याचा प्रभावी वापर कसा करावा, यासंदर्भात मार्गदर्शन केले. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित या अधिवेशनात हिंदू संघटनांची आवश्यकता, साधना, लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम, सामाजिक माध्यमांचा प्रभावी उपयोग कसा करावा, हिंदू विधिज्ञ परिषदेचे कार्य, धार्मिक उत्सवांची स्थिती यासह विविध विषयांवर चर्चासत्र तसेच सुराज्य अभियान आणि अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्र आणि धर्मकार्यात प्रत्येकाने यथाशक्ती सहभाग होण्याचा निर्धार समारोपप्रसंगी व्यक्त केला..









