दिवसभरात 613 जणांचा बळी, पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पंचवीस हजारांसमीप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत असून बाधितांबरोबरच मृतांच्या आकडय़ातही भरमसाठ वाढ होताना दिसत आहे. रविवारपर्यंत मागील चोवीस तासात तब्बल 613 बळींची नोंद झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडाही तब्बल 24,850 ने वाढला आहे. मृत आणि बाधितांच्या आकडय़ांमधील आजपर्यंतचा हा उच्चांक असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना संसर्गाच्या या वाढत्या आकडय़ांमुळे आरोग्य यंत्रणेसह सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
जगभरात थैमान घालणाऱया कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6 लाख 73 हजार 165 वर पोहोचली आहे. यापैकी 2 लाख 44 हजार 814 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर, 4 लाख 9 हजार 83 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात एकूण 19 हजार 268 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत जारी करण्यात आली आहे. दरम्यान, नवे कोरोनाबाधित रुग्ण आणि बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाण यातील फरकामध्ये सुधारणा होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. सध्या रिकव्हरी रेट 60 टक्क्यांच्या वर पाहोचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय पातळीवरील टक्केवारीपेक्षाही समाधानकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
आतापर्यंत जवळपास 1 कोटी चाचण्या
देशभरात 4 जुलैपर्यंत तब्बल 97 लाख 89 हजार 66 नमुने तपासण्यात आले होते. यातील 2 लाख 48 हजार 934 नमुन्यांची तपासणी अखेरच्या एका दिवसात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली. आता रविवारपर्यंत हा आकडा 1 कोटींपर्यंत पोहोचला असला तरी तो नेमका आकडा जारी करण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र, तामिळनाडू ‘टॉप’वर
देशातील विविध राज्यांचा विचार करता महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात या राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचा वेग झपाटय़ाने वाढत आहे. बाधितांच्या आकडय़ाने महाराष्ट्रात दोन लाखाचा तर तामिळनाडूत एक लाखाचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात जवळपास 200 ते 300 जणांचे बळी जात असून त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांमधील रुग्ण सर्वाधिक आहेत. तामिळनाडूत 4,280 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून तेथे एकूण संख्या 1 लाख 7 हजार इतकी झाली आहे. दिल्लीतही अडीच हजार रुग्णांची भर पडली असून तेथे आतापर्यंत 97,200 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात दिल्लीत 81 तर तामिळनाडूत 65 मृत्यूंची नोंद झाली आहे.
जगातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर सेवेत

दिल्लीत डीआरडीओ’कडून केवळ 11 दिवसात निर्मिती : 10 हजार बेड्स उपलब्ध
जगातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर रविवारी राजधानी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आले. सरदार वल्लबभाई पटेल कोव्हिड-19 हॉस्पिटल असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये 250 आयसीयू बेड्सह 10 हजार बेड्स उपलब्ध करण्यात आल्याने हे जगातील सर्वात मोठे कोविड हॉस्पिटल ठरले असल्याची माहिती डीआरडीओच्या अधिकाऱयांनी दिली. ‘डीआरडीओ’च्या नेतृत्त्वाखाली टाटा सन्स अँड इंडस्ट्रीजसारख्या काही संघटनांच्या मदतीने केवळ 11 दिवसात या कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली. हॉस्पिटलचे उद्घाटन दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी, आयटीबीपीचे प्रमुख एसएस देसवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.








