एक हजार नऊ रुग्णांपैकी सोळाजणांचा मृत्यू : आणखी बारा पॉझिटिव्ह : कोरोना सक्रिय 451
- ओरोस मधील 69 वर्षीय वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून योग्य प्रकारे उपचार होत असल्याने रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. जिल्हय़ाचा 1.6 एवढा मृत्यूदर आहे. मृत्यूदर कमी ठेवण्यात राज्यात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान मंगळवारी जिल्हय़ात आणखी 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 1 हजार 9 होऊन एक हजाराचा आकडा पार झाला आहे. दरम्यान जिल्हय़ात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मार्च अखेरीस जिल्हय़ात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जून अखेरपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात होती. जुलैमध्ये काही प्रमाणात रुग्ण वाढले. मात्र 1 ऑगस्टनंतर त्यात झपाटय़ाने वाढ होत गेली. पूर्वीच्या तुलनेत कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 12 हजारापर्यंत चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे रुग्ण लवकरात लवकर आढळून त्याच्यावर उपचार करणे व बरे करून पुढील काही दिवसात लवकरात लवकर कोरोना आटोक्यात आणणे शक्मय होणार आहे. तसेच रुग्णसंख्या वाढली असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत 542 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54 टक्क्यांच्या वर आहे.
जिल्हय़ाचा मृत्यूदर 1.6 टक्के
आतापर्यंत जिल्हय़ात कोरोनामुळे सोळाजणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.6 एवढा आहे. मृत्यूदर कमी ठेवण्यात सिंधुदुर्ग राज्यात पहिल्या पाच क्रमांकात आहे. तसेच कोरोनामुळे 16 जणांचा मृत्यू झाला असला, तरी यातील बहुतांश रुग्णांना इतर आजारांचाही त्रास होता, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ात आणखी 12 पॉझिटिव्ह रुग्ण
जिल्हय़ात मंगळवारी आणखी 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या एक हजाराचा आकडा पार करीत 1 हजार 9 झाली आहे. मंगळवारी आणखी 19 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 542 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान जिल्हय़ात आणखी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ओरोस येथील 69 वर्षीय महिला 23 ऑगस्टला गंभीर स्थितीमध्ये जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. उपचार सुरू असतानाच 24 ऑगस्टला सकाळी तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिचा स्वॅब घेण्यात आला होता. तो अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 451 आहे.
मंगळवारी नव्याने 12 रुग्ण आढळून आले. यात मालवण तालुक्मयातील श्रावण गावातील एक, कणकवली तालुक्मयातील करंजे एक, हरकुळ एक, कळसुली एक, कणकवली एक, सावंतवाडी तालुक्मयातील कलंबिस्त तीन, बांदा एक आणि सावंतवाडी एक आणि दोन रुग्णांची गावे समजू शकली नाहीत.
जिल्हा परिषद बंद ठेवणे अयोग्य – डॉ. हेमंत वसेकर
जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषद बंद ठेवणे योग्य ठरणार नाही. शासनाचे बंद ठेवण्याबाबतचे आदेशही नाहीत, असे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी स्पष्ट केले.
जि. प. बंद केली नसली, तरी सर्व जि. प. कर्मचाऱयांच्या आरोग्याची काळजी घेत आहोत, संपूर्ण जिल्हा परिषद निर्जंतुकीकरण करून घेण्यात आली आहे. तसेच सर्व कर्मचाऱयांची स्वॅब टेस्टिंग करण्यात येत आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांनी तातडीने स्वॅब टेस्ट कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच लक्षणे असणाऱया कर्मचाऱयांना क्वारंटाईन राहण्यासाठी शासनाने सूट दिलेली आहे. ते क्वारंटाईन होऊ शकतात. मात्र लक्षणे नसताना कर्मचाऱयांनी कार्यालयात न येणे योग्य नाही. आम्हाला सुद्धा आमच्या कर्मचाऱयांची काळजी आहे. मात्र जि. प. बंद ठेवता येणार नाही. आपण इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. कुणीही गैरसमज पसरवू नये, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी केले आहे. तर जि. प. मध्ये काही कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही ठराविक अधिकारी, कर्मचारी वगळता जि. प. बंद ठेवावी, अशी मागणी करणारे पत्र जि. प. अध्यक्ष समिधा नाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना दिले आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 11920
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 1009
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 10652
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 259
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 451
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 16
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 542
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 13434
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4224
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 202316
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 151









