28 रोजीच्या अहवालातील 46 मृत विविध तारखांचे
सातारा / प्रतिनिधी :
कोरोना संसर्गात आरोग्य विभागाने फ्रंटवॉरियर म्हणून चांगली कामगिरी केली, म्हणून त्यांना समाजाकडून सलामच केला जातोय. मात्र, दुसऱ्या लाटेपासून ज्या पध्दतीने जिल्हय़ात सुरु असलेली बाधित वाढ पाहता ती थांबणार कधी हा सवाल पडला असतानाच दि. 28 रोजीच्या अहवालात तब्बल 46 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यूची आकडेवारी प्रशासनाने दिल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, त्याची माहिती घेतली असता प्रत्यक्षात 34 मृत्यू आहेत व तेही विविध तारखांचे असल्याचे समोर आले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सलगपणे बाधित वाढीचा आलेख तीन अंकी संख्येने समोर येतोय. तर मृत्यूही दोन अंकी संख्येने समोर येत असल्याने नाही म्हटले तरी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण राहतेच. यापूर्वी कोरोना बाधित रुग्णांचे तपासणी केल्यावर ते अहवाल वेळेवर भरलेच जात नव्हते याचा घोटाळा ‘तरुण भारत’ने समोर आणल्यानंतर एकाच दिवशी तब्बल 5 हजारांच्यावर रुग्णांना कोरोनामुक्त करण्याचा विक्रमही सातारच्या प्रशासनाने केला होता.
त्यानंतर 800 च्या पटीत होणारी वाढ कधी कधी हजारांचा आकडाही पार करत असतानाच दि. 28 रोजी 701 बाधित 46 बाधितांचा मृत्यू अशी आकडेवारी प्रशासनाने दिली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झालीच पण एकाच दिवशी एवढे मृत्यू झाले असतील काय? अशी शंकाही मनात सातत्याने येत राहिली. जिल्हा माहिती कार्यालयाने 46 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली असली तरी दि. 28 रोजी प्रशासनाने जी बाधितांच्या मृत्यूची आकडेवारी लिस्ट केली आहे. त्यात 34 बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
34 बळी हा आकडा काही कमी नाही. एकाच दिवसात एवढे कोरोना बळी गेल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी किती यातायात करावी लागेल हे प्रशासनालाही ठावूक आहे. मात्र, अद्याप आकडेवारीचा हिशोब ठेवताना देखील आरोग्य विभागाचे नेमके काय चालले आहे ते कळेनासे झालेय. 28 रोजीच्या अहवालात 34 बाधितांच्या मृत्यूमध्ये 71 ते 95 वयोगटातील 16 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर 26 व 36, 44, 47, 48, 45 अशा 50 वयाच्या आतील सहाजणांचा मृत्यू झालाय. तर 70, 65, 62, 55, 60, 50 अशा 50 ते 70 वयोगटात सातजणांचा मृत्यू झाला आहे.
विविध तारखांना झालेल्या मृत्यूची नोंद
46 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वाचल्यानंतर जिल्हय़ातील नागरिकांना धक्का बसला. मात्र, प्रत्यक्षात अहवालात 34 मृत्यूंची नोंद आहे. कोणाचाही मृत्यू 28 रोजी झालेला नाही. तर 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत विविध दिवशी झालेले आहेत. मात्र, ते दि. 28 रोजीच्या अहवालात एकत्रित अपलोड करुन देण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी एवढी मृत्यूसंख्या पाहून हादरलेल्या नागरिकांसाठी हा फालोअप घेतला तेव्हा मृत्यूची आकडेवारी अपलोड करण्यातही घोटाळाच होत असल्याचे समोर आले आहे.
वेळच्या वेळी कामे करा
28 रोजीच्या अहवालात 20 जुलै ते 26 जुलै यामध्ये झालेल्या मृत्यूची एकदा माहिती देणार असला तर आरोग्य विभागाचा नेमका कारभार कसा सुरु आहे हेच समोर येते. एकीकडे कोरोनामुळे समाजाची आर्थिक, मानसिक, शारीरिक अवस्था बिकट झालीय. भीती, नैराश्य भावनांनी नागरिकांना ग्रासलेय. अशा वातावरणात पारदर्शकपणे काम करुन नागरिकांच्या मनातील भीती कमी करुन त्यांना जगण्यासाठी बळ देण्याऐवजी जिल्हय़ात ज्या पध्दतीने बाधित वाढ आणि मृत्यूसत्र सुरु आहे ते कधी थांबणार? आकडेवारीचे हे गफले थांबवून पारदर्शकता कधी आणणार हा नागरिकांचा सवाल आहे.
त्यामुळेच आता वाटेना कोरोनाचे भय संपूर्ण राज्यभर कोरोनाची साथ आटोक्यात येत आहे. मुंबई, पुण्यातही सातारा जिल्हय़ापेक्षा कमी रुग्णसंख्या समोर येत आहे. सातारा जिल्हा मात्र हजारांच्या संख्येने नवीन रुग्ण समोर आणत आहे. हे नेमके चाललेय काय? या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडून मिळत नाही. त्यातच आता मृतांच्या आकडेवारीही अशा प्रकारे सोयीनुसार भरत असाल तर अवघडच आहे. आकडेवारीच्या जोरावर पुन्हा लॉकडाऊनची टागंती तलवार, पुन्हा बेरोजगार अन् घरात बसा. यापेक्षा सगळे सुरु करा, कोरोनाचे आता भयच वाटत नाही, या नागरिकांच्या प्रतिक्रियाही अस्वस्थ करणाऱ्या आहेत.









