केंद्र सरकारचा उत्तर प्रदेश, बिहारला आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या आठ दिवसांत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीत अनेक मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह कोरोना विषाणूमुळे मृत्यू पडलेल्यांचे असावेत, असा संशय व्यक्त होत आहे. या संशयाला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी जनतेच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव गंगेत मृतदेहांचे विसर्जन करू नये, असा आदेश केंद्र सरकारने काढला आहे.
केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष राजीव रंजन मिश्रा यांनी हा आदेश काढला आहे. नमामी गंगेत या प्रकल्पाच्या अंतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. तथापि मृतदेह गंगेत सोडल्यामुळे या मोहिमेला मोठा अडथळा निर्माण होत आहे. गंगा नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे ही साऱयांची जबाबदारी असून कोणत्याही राज्यात त्यात ढिलाई दाखवू नये, कोणत्याही कारणास्ताव एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार योग्य पद्धतीने व्हावेत, रोग प्रसार होईल, अशी स्थिती निर्माण करू नये, असे आदेशात म्हटले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना हे कळविण्यात आले आहे.