आज बलिप्रतिपदा (पाडवा), भाऊबीज : घरोघरी उत्साहाचे वातावरण : व्यापारीवर्गही सज्ज
प्रतिनिधी/ निपाणी
दिपोत्सवातील मुख्य दिवस तसेच साडेतीन मुहुर्तापैकी एक असणारा बलिप्रतिपदा अर्थात पाडवा सोमवारी सर्वत्र साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घरोघरी उत्साहाचे वातावरण दिसत असून मुहूर्त साधण्यासाठी व्यापारीवर्गही सज्ज झाला आहे. पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी असल्याने पत्नीकडून औक्षण तसेच बहिणीकडूनही ओवाळणी होणार आहे.
दिवाळीला सुरुवात होताच कोरोनाच्या छायेत असलेल्या जनतेवरील भीतीचे अन् चिंतेचे ढग दूर झाले आहेत. सुख, समृद्धी आणि सदृढ आरोग्याचा प्रकाश घरोघरी यावा यासाठी उत्साहाने दिवाळी सण साजरा केला जात आहे. शनिवारी सर्वत्र धुमधडाक्यात लक्ष्मीपूजन करण्यात आले. त्याबरोबरच काही ठिकाणी रविवारीही लक्ष्मीपूजन करण्यात आले. गुरुवारी वसुबारसपासून सुरू झालेल्या या सणाचा सर्वत्र उत्साह कायम असून घरोघरी मंगलमय वातावरण पहायला मिळत आहे.
सोमवारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा आहे. यादिवशी गोवर्धनासह बलिपूजन करण्याचा प्रघातही आहे. यादिवशी व्यापाऱयांचे नववर्ष सुरू होते. दुकानांसह उद्योग, व्यवसायाच्या ठिकाणी वहीपूजन तर घरोघरी औक्षण आदी कार्यक्रम पार पाडले जातात. पाडव्याबरोबरच भाऊबीजही सोमवारी साजरी होणार आहे. भावा-बहिणींसाठी पवित्र प्रेमाचे प्रतिक म्हणून भारतीय संस्कृतीत भाऊबीज हा सण मोठय़ा उत्साहात साजरा होतो. त्यादृष्टीनेही घरोघरी तयारी सुरू आहे.
व्यापारीवर्गात उत्साह
सीमावर्ती प्रमुख बाजारपेठ असलेल्या निपाणीत गेल्यावर्षी महापूर व यंदा कोरोना यामुळे मंदी आल्याने निरुत्साही वातावरण दिसत होते. मात्र दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांची तोबा गर्दी उसळल्याने व्यापारीवर्गात उत्साह संचारला आहे. सोमवारी दिवसभर खरेदीसाठी अनुकूल मुहूर्त असल्याने हा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहक व व्यापारी दोघेही सज्ज झाले आहेत. यादिवशी इलेक्ट्रॉनिक, वाहन, सराफ, भांडी आदी क्षेत्रात मोठी उलाढाल होणार आहे. त्यादृष्टीने आकर्षित करण्यासाठी आकर्षक सवलतींचा पाऊस पाडला जात आहे.









