वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनच्या 3 फेब्रुवारी रोजी होणाऱया अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेने आपला निरीक्षक पाठविणार असल्याचे कळविले आहे.
अखिल भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेची अध्यक्षपदाची निवडणूक पारदर्शक आणि मोकळय़ा वातावरणात होण्यासाठी बीएफआयने आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेला निरीक्षक पाठविण्याची विनंती केली होती, अशी माहिती एआयबीएचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी दिली. गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात क्रेमलेव्ह यांनी आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. दरम्यान अखिल भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेचे आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेशी आर्थिक समस्येवर असलेले मतभेद क्रेमलेव्ह यांनी सामोपचाराने मिटविले आहेत. 39 वर्षीय क्रेमलेव्ह हे यापूर्वी रशियन मुष्टीयुद्ध फेडरेशनचे सदस्य होते. 3 फेब्रुवारी रोजी होणाऱया अखिल भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेच्या अध्यक्षपदाच्या रिंगणात अजय सिंग आणि भाजपाचे नेते तसेच मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आशिष शेलार उतरले आहेत.









