वास्कोतील कुटुंबाची व्यथा : मुलीच्या बाळंतपणासाठी गेली होती इंग्लंडला
4 अनिलकुमार शिंदे, वास्को
बाळंत झालेल्या आपल्या मुलीच्या सेवेसाठी उत्साहाने इंग्लंडला रवाना झालेल्या त्या मातेला अखेर मृत्यूने गाठले. तिला कोरोनाची बाधा झाली नाही. मात्र, मुलीला झालेल्या कोरोनाच्या धसक्यानेच तिने जीव सोडला. तिची मुलगी सध्या इंग्लडच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाशी झुंज देत आहे. आपली पत्नी गेली. निदान आपल्या मुलीचा तरी जीव वाचावा यासाठी देवाकडे प्रर्थना करा, अशी आर्त विनवणी तिचे वडिल करीत आहेत.
वास्कोतील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही व्यथा. दोन मुली आणि आई वडिल असे हे कुटुंब. दोन्ही मुली उच्च विद्या विभुषीत. एक इंग्लडमध्ये स्थायिक तर दुसरी पुण्यात सॉफ्टवॅअर इंजिनियर म्हणून एका कंपनीत सेवा बजावते. वडिल वास्कोत एका केंद्रीय संस्थेचे कर्मचारी आहेत. ते निवृत्तीकडे झुकलेले आहेत. मूळ गोव्याचे नसले तरी त्यांचा जन्म गोव्यातलाच. वास्कोतच ते व त्यांची मुले लहानाची मोठी झाली. या सुखी कुटुंबावर प्रथमच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पत्नी गेली. परंतु तिला आता कधीच पाहता येणार नाही. मुलगी कोरोनाशी झुंज देत आहे. तिलाही पाहता येत नाही.
इटली, स्पेन, अमेरिका पाठोपाठ इंग्लडमध्येही कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. या हाहाकारात तेथील स्थायिक भारतीयही होरपळले जात आहेत. इंग्लंडमध्ये आतापर्यंत जवळपास एक लाख लोक कोरोनाबाधीत झालेले आहेत. तर जवळपास तेरा हजार लोकांचा मृत्यू झालेला आहे. वास्कोतील या कुटुंबालाही इंग्लंडमधल्या परिस्थितीला शरण जावे लागलेले आहे.
कोरोनाच्या धसक्याने घेतला आईचा बळी
वास्कोतील मांगोरहिल या भागातील ही महिला आपल्या मुलीच्या बाळंतपणासाठी हल्लीच इंग्लंडला रवाना झाली होती. तिची मुलगी व जावई नोकरी निमित्त तिथे स्थायिक झाले आहेत. मुलगी एका हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहे. जगभर कोरोनाचे संकट घोंगावू लागल्याने या सेविकेलाही आपल्या कर्तव्याला जागावे लागले. बाळंतपणानंतर ती सेवेत रूजू झाली होती. कोरोना रूग्णांप्रती आपली सेवा बजावतानाच तिला कोरोनाचा संसर्ग कधी जडला हे तिलाही कळले नाही. तिलाच उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. मात्र, संसर्गाचा धसका तिच्या सेवेसाठी आलेल्या मातेने घेतला. कदाचित आता आपल्यालाही कोरोना होईल या भितीने तिला ग्रासले असावे. मंगळवारी जवळपास 55 वर्षे वयाच्या या महिलेला हृदय़विकाराचा तीव्र झटका आला व ती या झटक्यानेच गेली. जावई आणि नुकतेच जन्मलेले कन्यारत्न मात्र अद्याप कोरोनाच्या लक्षणांपासून मुक्त आहेत.
त्यांच्यासाठी अंत्यदर्शनही ठरले दुरापास्त
ही माहिती वास्कोत पतीला मिळताच त्यांच्यावर ध्यानीमनी नसलेले संकट कोसळले. इंग्लंडमध्ये प्रयाण करणे शक्यच नव्हते. निदान तिचा मृतदेह तरी गोव्यात आणावा यासाठी त्याने दोन दिवस बरेच प्रयत्न केले. मात्र, सर्व प्रयत्नही व्यर्थ ठरले. सद्यस्थितीत तिचा मृतदेह गोव्यात आणणे शक्य नाही. त्यामुळे या कुटुंबाचे इंग्लंडमधील काही जवळचे नातेवाईक तिचे क्रियाक्रम करतील अशी माहिती या कुटुंबाच्या काही मित्रांनी दिली. पत्नी गेली तरी पतीला आणि तिच्या दुसऱया मुलीला अंतिम दर्शन घेणेही शक्य नाही. आता इंग्लंडमधील हॉस्पिटलमध्ये कोरोनाशी झुंज देणारी मोठी मुलगी वाचावी यासाठी ती देवाकडे प्रार्थना करीत आहेत. त्यांची विचारपूस व सात्वन करणाऱयांनाही ती देवाकडे आपल्या मुलीसाठी प्रार्थना करावी अशी आर्त विनवणी करीत आहेत.
वडिल व मुलीवर दुःखातही क्वारन्टाईन होण्याची पाळी
आपली आई गेल्याची व बहिण कोरोनाशी झुंजत असल्याची माहिती मिळताच दुःखाचा डोंगर कोसळलेली पुण्यातील या कुटुंबातील दुसरी मुलगी महाराष्ट्र सरकार आणि गोवा सरकारचे सोपस्कर आणि सहकार्याने बुधवारी रात्री वास्कोत पोहोचली. बुधवारची रात्र वडिलांनी आणि या मुलीने दुःख पचवत काढली. गुरूवारी सकाळी त्यांना चिखलीचे उपजिल्हा हॉस्पिटल गाठावे लागले. वडिलांची व मुलीची पूर्ण तपासणी करण्यात आली. दोघांमध्ये कसलीही आजारपणाची लक्षणे दिसून आलेली नाहीत. परंतु कोरोनाने ग्रासलेल्या पुण्यातून ही मुलगी आल्याने दोघानाही पुढील चौदा दिवसांसाठी क्वारन्टाईन व्हावे लागले आहे. सध्या वास्कोतील केंद्रीय संस्थेच्या वसाहतीतील आपल्या खोलीतच ती क्वारन्टाईन आहेत. केंद्रीय संस्थेने व गोव्याच्या आरोग्य खात्यानेही त्यांच्यावर देखरेख ठेवली आहे.









