पोलीस उपायुक्तांकडे पालकांनी केली तक्रार
प्रतिनिधी/ बेळगाव
मार्केट पोलिसांनी 28 ऑक्टोबर रोजी मोटार सायकल चोरी प्रकरणी चौघा जणांना अटक करुन 8 मोटार सायकली जप्त केल्या होत्या. आता दोन मुलांच्या पालकांनी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार करुन आपल्या मुलांना नाहक चोरी प्रकरणात गोवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भडकल गल्ली येथील सुरेखा राजू वाडकर व चव्हाट गल्ली येथील शालन श्रीकांत इंगळे यांनी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांची भेट घेवून एक निवेदन दिले आहे. आमच्या मुलांना मोटार सायकल चोरी प्रकरणात मार्केट पोलिसांनी विनाकारण गोवल्याचा आरोप या दोन्ही महिलांनी केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या चौघा जणांमध्ये शुभम वाडकर व ओंकार इंगळे या दोन मुलांचा समावेश आहे. सध्या ही दोन्ही मुले न्यायालयीन कोठडीत आहेत. 26 ऑक्टोबर रोजी किरकोळ मारामारीचा प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. चोरी प्रकरणात त्यांना गोवल्याचा आरोप करण्यात आला आहे.









