गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा आरोप : उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी
प्रतिनिधी /मडगाव
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या पुतण्याच्या एमबीबीएसच्या पॅथोलॉजी विषयाचे गुण वाढवण्यासाठी गोमेकॉच्या कार्यकारी डीनवर दबाव आणल्याचा आरोप करत या घटनेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.
सरदेसाई यांनी मंगळवारी मडगाव येथे पत्रकार परिषद घेऊन दावा केला की, एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकत असलेला सावंत यांचा पुतण्या रेमेडियल परीक्षेत पॅथोलॉजी विषयात केवळ 18.25 गुण मिळवून नापास झाला होता. उत्तीर्ण होण्यासाठी त्याला 24.5 गुण हवे होते, जे मुख्यमंत्र्यांनी डीनवर दबाव आणून वाढवायला सांगितले, असा आरोप त्यांनी केला.
कुलगुरूंनी परीक्षेचे सर्व पेपर तत्काळ सील करून चौकशी करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन गुण नोटीस बोर्डवर लावतात, परंतु या प्रकरणात तसे झाले नाही, असाही दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी सरकारी नोकऱयांच्या परीक्षेत गुणांमध्ये फेरफार केले आणि आता एमबीबीएसच्या परीक्षेतही ते तेच करत आहेत. भाजपच्या राजवटीत गुणवत्तेला स्थान नाही. या मुख्यमंत्र्यांनी पात्र उमेदवार आणि विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याने या प्रकरणी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले पाहिजे, असे सरदेसाई म्हणाले. हा एक अतिशय गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, असे ते म्हणाले.









