मुंबई / ऑनलाईन टीम
कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका केशकर्तनालय चालकाचा पोलीस कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या उस्मानपुरा येथे घडली. मृताच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन जबाबदार पोलिसांवर कारवाईची मागणी करत प्रेतासह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झाले आहे. केशकर्तनालय उघडे ठेवले म्हणून पोलिसांनी औरंगाबादला प्राण जाईपर्यंत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. राज्यात अक्षरशः अराजक माजले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये उस्मानपुरा भागातील पीरबाजार परिसरात केशकर्तनालय चालकाचा मृत्यू झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अर्धवट शटर लावून आतमध्ये कटिंग, दाढी सुरू असल्याच्या संशयावरून केशकर्तनालय चालक फेरोजखानला पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतलं होतं. त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत फेरोज खान याचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. फेरोजला मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी करीत हजारो नागरीक आणि नातेवाईक उस्मानपुरा पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. ठाण्याच्या दारात प्रेत ठेवून आंदोलन केले. जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत प्रेत येथून उचलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.