पंजाब/प्रतिनिधी
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर काँग्रेसकडून चर्चा सुरू असतानाच आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दंड थोपाटले आहेत. मुख्यमंत्री करायचाच असेल तर तो माझ्या गटातील करा, नाही तर बहुमत चाचणीला तयार राहा असा थेट इशारा त्यांनी हायकमांडला दिला आहे. त्यामुळे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन करून हा इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. माझ्या समर्थक आमदाराला मुख्यमंत्री नाही केलं तर फ्लोअर टेस्टला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असं सिंग यांनी हायकमांडला सांगितल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याची निवड करणं काँग्रेससाठी डोकेदुखी झाली आहे.
मला अपमानित झाल्यासारखं वाटलं
दरम्यान, पंजाबचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. पंजाबमध्ये शनिवारी सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, अखेर संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सहभागी न होताच त्यांनी राज्यपालांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले. राज्यपालांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सूपर्द केला. यांनतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, आपल्या राजीनाम्यामागचं कारण स्पष्ट केलं. ज्या प्रकारे बोलणं झालं त्यावरून मला अपमानित झाल्यासारखं वाटलं आहे. शनिवारी सकाळी मी काँग्रेसच्या अध्यक्षांशी बोललो आहे आणि मी त्यांना सांगितलंय की आज मी राजीनामा देतो आहे. अलिकडच्या महिन्यांत आमदारांना भेटण्याची ही तिसरी वेळ आहे… म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय.