मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. पुन्हा लॉकडाउन होणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत यासंबंधी माहिती दिली. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीत राज्यात अंशत: लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. या बैठकीनंतर मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. सरकारने काही दिवसांपूर्वी रात्रीच्या जमावबंदीचे आदेश दिले होते, परंतु अद्यापही अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होताना दिसत आहे, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे. दैनंदिन रुग्णवाढीने गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. गुरुवारी 24 तासांत राज्यात 43 हजार 183 नव्या रुग्णांचे निदान झाले, तर 249 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक 8646 नवे रुग्ण मुंबईत आढळले. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 66 हजार 533 झाली असून त्यातील सर्वाधिक 64,599 रुग्ण पुण्यात असून, मुंबईतील 54,807 रुग्णांचा समावेश आहे.