355 श्वानांचा मृत्यू
रशिया-युक्रेन युद्ध मागील 40 दिवसांपासून सुरू आहे. प्रत्येक नव्या दिवशी या युद्धाचा आणखीन क्रूर चेहरा समोर येत आहे. बुकामध्ये मिळालेल्या सामूहिक दफनभूमींनी जगाला पूर्वीच हादरविले आहे. आता कीव्हच्या बोरोडय़ांकामधून आलेले वृत्त अधिकच वेदनादायी आहे. बोरोडय़ांकामध्ये असलेल्या ऍनिमल शेल्टरमध्ये 355 श्वानांचा मृत्यू झाला आहे. या श्वानांचा मृत्यू कुठलेही क्षेपणास्त्र किंवा बॉम्बमुळे नव्हे तर अन्नपाण्याअभावी झाला आहे.
प्राण्यांयच अधिकारांचे रक्षण करणारी संस्था युऍनिमल्सने यासंबंधी माहिती दिली आहे. रशिया-युक्रेन युद्धाने या मुक्या प्राण्यांवर मोठा प्रभाव पाडला आहे. या प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था करणे अत्यंत आव्हानाम्मक ठरले आहे. याचमुळे ऍनिमल शेल्टरमध्ये राहणाऱया 355 श्वानांनी स्वतःचा जीव गमावला आहे. या शेल्टरमधून केवळ 150 श्वानांनाच सुरक्षित बाहेर काढता आले आहे.
युद्धभूमीवरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये प्राणी पोरके झाल्याचे किंवा जखमी झाल्याचे दिसून येते. काही लोकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना अन्य देशांमध्ये नेण्यास यश मिळविले आहे. तर काही प्राण्यांना अन्य देशांकडून आश्रय देण्यात आला आहे. परंतु युक्रेनमध्ये युद्धामुळे अनेक प्राणी अद्याप संकटात सापडले आहेत.









