डायबेटिस अर्थात मधुमेहामुळे शरीराच्या इतर अवयवांवर होणारे परिणाम अनेकदा विचारात घेतले जात नाहीत. परंतु ते काही वेळा गंभीर असू शकतात. तसेच या जोडीला अन्यही काही आजार जडण्याची दाट शक्यता असते. डायबेटिस न्यूरोपॅथी हे यापैकीच एक. यामध्ये आपल्या चेतासंस्थेवर गंभीर परिणाम होऊन स्पर्शज्ञान कमी होते आणि स्नायूंची ताकदही कमी होते.
कशामुळे होतो?
ङरक्तातील साखरेचे प्रमाण जास्त काळ वाढलेले राहणे, रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढणे, रक्तदाब वाढणे, धूम्रपान, दारूचे व्यसन यांमुळे हा विकार होऊ शकतो.
लक्षणे कोणती?
ङयामध्ये तळहाताच्या छोटय़ा स्नायूंची ताकद कमी होते. त्यामुळे हाताची पकड सैल पडते. पायाच्या पंजाची ताकद कमी होते. चालताना पंजा वर उचलता येत नाही. जिना चढताना, झोपलेल्या स्थितीतून उठताना, उठताना ताकद कमी पडते. चालताना गुडघे लपकतात, तोल जातो आणि त्यामुळे सारखे पडायला होते. हात खांद्याच्या वर उचलायला त्रास होतो. हातापायांना बधिरता येतो, स्पर्श कळत नाही. परिणामी, जखमा झालेल्या लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे इन्फेक्शन होते. मुख्यतः रूग्णांना ही लक्षणे सुरूवातीला जाणवत नाहीत आणि हळूहळू त्यांची तीव्रता वाढू लागते.
उपचारांची दिशा
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे आहे. फिजिओथेरपी मधुमेह नियंत्रित ठेवण्यास अत्यंत उपयुक्त ठरते. सामान्यतः मधुमेहींना 2 प्रकारचे व्यायाम दिले जातात. एक म्हणजे ताकद वाढविण्यासाठीचे व्यायाम आणि दुसरे म्हणजे एरोबिक व्यायाम-उदा. चालणे, पोहणे, सायकलिंग वगैरे. साधारणपणे, मधुमेहींना संपर्ण आठवडाभरात एकूण मिळून 150 मिनिटे व्यायाम करणे फायदेशीर ठरते.
निदान आणि उपचार
डायबेटिसचे निदान झाल्यानंतर नियमितपणे रक्तातील साखरेचे आणि कोलेस्टरॉलचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. तसेच, रूग्णाचे स्वतः दररोज हातापायांची त्वचा तपासणे गरजेचे आहे. कुठे बधिरपणा जाणवल्यास, कुठे दुखत असल्यास त्वरित तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. काही वेळा ईएमजी (इलेक्टोमायोग्राफी) आणि नर्व्ह कंडक्शन व्हेलोसिटी यांसारख्या तपासण्या करून न्यूरोपॅथीचे निदान निश्चित केले जाते.









