रियाद (सौदी अरेबिया)
एएफसी चॅम्पियन्स लीग क्लब स्तरीय फुटबॉल स्पर्धेत मुंबई सिटी एफसी संघाचे आव्हान संपुष्टात आले. शुक्रवारी झालेल्या ब गटातील सामन्यात सौदी अरेबियाच्या अल साहेब फुटबॉल क्लबने मुंबई सिटी एफसीचा 6-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात अल साहेब संघातील हातेन बाहेब्रीने हॅट्ट्रीक नोंदविली.
शुक्रवारच्या या सामन्यात अल साहेबच्या तुलनेत मुंबई सिटी एफसी संघाचा खेळ दर्जेदार होवू शकला नाही. या सामन्यातील विजयामुळे अल साहेब क्लबने ब गटात आघाडीचे स्थान मिळवीत या गटातील विजेता ठरला. या सामन्यात अल साहेबचे खाते 19 व्या मिनिटाला बाहेब्रीने उघडले. मध्यंतराला दहा मिनिटे बाकी असताना कार्लोस ज्युनियरने अल साहेबचा दुसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत अल साहेबने मुंबई एफसी संघावर 2-0 अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धातील खेळाच्या सातव्या मिनिटाला अब्दुल्ला अल जोईने अल साहेबचा तिसरा गोल केला. 64 व्या मिनिटाला बाहेब्रीने संघाचा चौथा तर वैयक्तिक दुसरा गोल केला. 65 व्या मिनिटाला बाहेब्रीने तिसरा गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधताना अल साहेब संघाला 5-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यास 9 मिनिटे बाकी असताना बाहेब्रीच्या पासवर कार्लोस ज्युनियरने अल साहेबचा सहावा आणि शेवटचा गोल नोंदवून मुंबई एफसी संघाचे आव्हान संपुष्टात आणले.
या स्पर्धेत अल साहेब संघाने ब गटातून पाच सामन्यांतून 13 गुणांसह पहिले स्थान पटकावीत या स्पर्धेच्या शेवटच्या 16 संघांमध्ये होणाऱया फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीमध्ये अल हिलाल आणि कतारचा अल दुहेल यांनीही स्थान मिळविले आहे. मुंबई एफसी संघाचा या स्पर्धेतील शेवटचा सामना एअर फोर्स क्लबशी होणार आहे.









