पुणे \ ऑनलाईन टीम
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नगर, बीड, रायगड, पालघर या जिल्ह्य़ांतील निर्बंध कायम राहणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. या जिल्ह्य़ांमध्ये सध्याच्या नियमानुसार दुकाने दुपारी ४ पर्यंतच खुली राहतील. या जिल्ह्यांपैकी पुणे जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याचसंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का?, असा प्रश्न ट्विटरवरुन विचारला आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये मोहोळ यांनी पालमंत्र्यांसोबतच्या बैठकीत म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत आपण कायमच निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील मागणी केल्याचंही म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवरच पालकमंत्री कोरोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो आहे. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे, अशा शब्दांमध्ये मोहोळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य शासनाने सोमवारी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर केली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नगर, बीड, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे नियम कायम ठेवले आहे. पण मुंबईतील दुकाने, कार्यालये आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंतची परावनगी दिली आहे.








