‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल : मदतीसाठी शेकडो हात सरसावले : मुख्यमंत्री, साबांखामंत्र्यांनीही केली मदत
प्रतिनिधी / पणजी
मुंबईत लॉकडाऊनमुळे अडकलेल्या श्रीमती अँजेलिना आणि त्यांचे पती शालू फर्नांडिस यांना अखेर गोव्यात आणण्याची सर्व तयारी झाली असून काल शुक्रवारी मध्यरात्री त्यांना इस्पितळातून बाहेर आणण्यात येईल. पनवेलहून रेल्वेने ते रविवारी गोव्यात पोहोचतील. अँजेलिनाला मदत करण्यासाठी शेकडो हात पुढे सरसावले आहेत.
अँजेलिना व त्यांचे पती शालू फर्नांडिस हे दांपत्य काले येथील आहे. गेले पावणेदोन महिने मुंबईत अडकून पडलेल्या या महिलेचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध होताच शेकडो लोकांनी अँजेलिना व त्यांची चांदोर गोवा येथील कन्या पर्सी हिच्याशी संपर्क साधला. उत्तर गोवा जिल्हा कार्यालयाचे मामलेदार प्रवीण गावस यांनी ‘तरुण भारत’मधील वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी आर. मेनका यांच्यासमोर प्रस्ताव मांडवा. तसेच मुंबईतील इम्रान पिरानी या समाजसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबईतून पाठविण्याची व्यवस्था करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
मंत्री दीपक पाऊस्कर यांच्याकडून हालचाली
सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांनी अँजेलिना यांची कन्या पर्सी हिला सावर्डे येथे बोलावून घेतले व अँजेलिना व शालू फर्नाडिस या दोघांनाही गोव्यात आणण्यासाठी हालचाली चालू केल्या आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.
मुख्यमंत्रीही पुढे सरसावले
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुपारी बँक अधिकाऱयांबरोबर बैठक घेतल्यानंतर ‘तरुण भारत’मधील वृत्ताची दखल घेऊन त्वरित मुंबईशी संपर्क साधला. महाराष्ट्र सरकार पातळीवर सदर महिला व तिचा पती या दोघांनाही गोव्यात आणण्यासाठीची प्रक्रिया त्वरित सुरू करा, असा आदेश दिला. गोव्यात जिल्हाधिकाऱयांनाही स्थानिक पातळीवर गोव्यात प्रवेश देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. एवढे करून न थांबता मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून उभयतांच्या प्रवासाचा खर्च केला आहे.
आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्याकडूनही दखल
‘तरुण भारत’मधील वृत्ताची कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनीदेखील दखल घेतली. त्यांनी अँजेलिनाची कन्या पर्सी हिच्याशी संपर्क साधून त्यांना गोव्यात आणण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
वृत्त प्रसिद्ध होताच पर्सी फर्नांडिस तसेच अँजेलिना यांना शेकडो नागरिकांनी फोन करून मदतीचे आश्वासन दिले, मात्र सरकारी पातळीवरच त्यांना गोव्यात आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने पर्सीने कोणाचीही मदत घेतली नाही. मामलेदार प्रवीण गावस यांनी मुंबईतील इस्पितळाला फोन करून अँजेलिना यांना शुक्रवारी डिस्चार्ज देऊ नका, अशी विनंती केली. ती इस्पितळाने अखेर मान्य केली व त्यांना तिथे ठेवले.
विलगीकरणाचा खर्चही सरकारकडून
सायंकाळी अँजेलिना व शालू यांना गोव्यात येण्यासाठी रेल्वेगाडीची तिकिट काढण्यात आली. त्यानुसार आज मध्यरात्रीच्या दरम्यान मुंबईतील इस्पितळातून शालू व अँजेलिना यांना एका कारमध्ये बसवून पनवेलला घेऊन जाण्यात येईल. तिथे गोव्याला जाणाऱया रेल्वेगाडीत त्यांना बसवून उद्या दोघेजण गोव्यात परतल्य़ावर त्यांची तपासणी करून विलगीकरणात पाठविण्यात येईल. त्याचा खर्च देखील सरकारच करणार आहे.









