प्रतिनिधी /बेळगाव
मीरापूर गल्ली येथील महेश ग्रामोपाध्ये संचालित शिवचिदंबर मंदिरात श्रावण सोमवारी 1111 शिवलिंगांची पूजा करण्यात आली. ग्रामोपाध्ये यांनी तीन तप दर श्रावणामध्ये एका सोमवारी ही पूजा करण्याचा संकल्प केला असून दोन तपे पूर्ण झाली आहेत. पूजेचे यंदाचे 34 वे वर्ष आहे.
जगत्कल्याण व विश्वशांतीसाठी त्यांनी हा संकल्प सोडला आहे. सोमवारी त्यांच्यासह गणेश फडके, मंदार फडके, गुंडोपंत कुलकर्णी यांनी दुपारी तीन वाजता पूजेला प्रारंभ केला. साडेचार वाजता शिवलीलामृताचे वाचन करण्यात आले. त्यानंतर पूजा, आरती झाली. कोरोनामुळे यंदा भाविकांना दर्शनासाठी निमंत्रण देता न आल्याबद्दल महेश ग्रामोपाध्ये यांनी दिलगिरी व्यक्त केली. या शिवलिंगांच्या मध्यभागी चिदंबर ग्रामोपाध्ये व विनायक इटगीकर यांनी धान्याचा वापर करून श्री गणपतीची प्रतिमा रेखाटली आहे.
सदर शिवलिंगांसाठी येळ्ळूर येथून वारुळाची माती आणण्यात आली आहे. बुधवारी खानापूरच्या मलप्रभा नदीकिनारी या शिवलिंगांचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे.









