भाडे विचारल्याच्या कारणातून रुग्णाच्या डोक्यात घातली प्लास्टिक खर्ची
प्रतिनिधी / मिरज
वैद्यकीय पांढरी समजल्या जाणाऱ्या मिरज शहरात विशेषतः मोठी रुग्णालय असलेल्या परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांची भाईगिरी सुरू असल्याचे दिसते.डॉ. संजीव कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलसमोर एका प्रवासी महिलेने रिक्षाचे भाडे विचारल्यावरून रिक्षा चालकाने अश्लील शिवीगाळ करून महिला प्रवाशासह रुग्णाला मारहाण केली. त्यांच्या डोक्यात प्लास्टिक खुर्ची मारून जखमी केले. याबाबत सदर महिलेचा भाऊ यशवंत भिमाप्पा शिंदे (वय 37, रा. निडगुंडी, ता. रायबाग) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, रिक्षा चालक गौरव विशाल करोले (वय 20, रा. झारीबाग झोपडपट्टी, मिरज) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सदर महिला आणि त्यांचा भाऊ यशवंत शिंदे हे कर्नाटकातील रायबाग येथील असून, उपचारासाठी ते मिरजेत आले होते. यावेळी डॉ. संजीव कुलकर्णी हॉस्पिटल समोर गौरव करोले हा रिक्षा (एमएच-10-एडब्ल्यू-0145) घेऊन थांबला होता. त्यावेळी सदर महिलेने स्टँडकडे जाण्यासाठी रिक्षाचे भाडे किती ? असे विचारले असता गौरव याने उद्धट भाषा बोलून महिलेशी वाद घातला.
तसेच तिला मारहाण करून ढकलून दिले. याचा जाब विचारणाऱ्या यशवंत शिंदे यांनाही मारहाण करीत त्यांच्या डोक्यात प्लास्टिकची खुर्ची मारून जखमी केले. यामुळे नामवंत समजल्या जाणाऱ्या रुग्णालयासमोर नागरिकांना आणि परराज्यातून आलेल्या रुग्णांना रिक्षा चालकांच्या भाईगिरीचा सामना करावा लागत आहे.